कराड : कराड चिपळूण मार्गावर विहे गावच्या हद्दीत भरधाव वेगातील चारचाकी क्रुझर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने भीषण अपघात घडला. गाडी उसाच्या शेतातून पलीकडे जाऊन 30 ते 35 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. मंगळवारी सायंकाळी ही भयंकर घटना घडली. या अपघातातील गाडी रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली होती. परंतु, पाऊस सुरू असल्याने आणि अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. या अपघातातील चालक बेपत्ता होता. आज सकाळी विहरीत चालकाचा मृतदेह पोलिसांना सापडला. संभाजी पवार असे गाडीतील मृत चालकाचे नाव असून ते पाटण मल्हारपेठ येथील रहिवासी आहे. चालकाशिवाय गाडीत अन्य कोणी नसल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
क्रुझर चालक संभाजी पवार हे पाटण मल्हार पेठचे रहिवाशी असून, मल्हार पेठ स्टॉपवर त्यांचा कोल्ड्रिंकचा व्यवसाय आहे. त्याचबरोबर ते टुरिस्टचाही व्यवसाय करत होते. क्रुझरसह आणखी एक गाडी त्यांनी व्यवसायासाठी विकत घेतली होती. ते काल कराडमध्ये टुरिस्ट भाडे ठरवण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी बोलणी करून ते परत कराडहून मल्हार पेठकडे निघाले असता विहे गावात त्यांनी भाजी घेतली आणि घराकडे निघाले. भाजी घेतलेल्या ठिकाणापासून अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर गाडीवरील त्यांचा ताबा सुटला. गाडी कराड चिपळूण रोडपासून 25 फूट आत शेतात असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळली. यात संभाजी पवार यांचा बुडून मृत्यू झाला.
रात्री पोलिसांनी गाडी बाहेर काढली मात्र गाडी त्यांचा मृतदेह सापडला नाही. गाडीच्या काचा फुटल्याने ते पाण्यात फेकले गेले असावेत असा पोलिसांनी अंदाज बांधून विहिरीत शोध सुरू केला. पहाटे त्यांचा मृतदेह सापडला. पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. संभाजी पवार यांच्या अपघाती मृत्यूने मल्हार पेठ गावावर शोककळा पसरली आहे.