दिनकर थोरात, Tv9 मराठी, प्रतिनिधी, कराड : कराडच्या शिवकन्या रिक्षाची अभिनेता व खासदार अमोल कोल्हे यांना भुरळ पडली आहे. कराडच्या संग्राम व सागर शिंदे यांनी व्यवसाय करत शिवभक्ती जपली. गड किल्ले स्वरुपात हा रिक्षा तयार केला. कराड येथे खाजगी कार्यक्रमासाठी खासदार अमोल कोल्हे आले होते. हा रिक्षा कोल्हे यांच्या नजरेस पडला. त्यांनी रिक्षाचे मालक असलेल्या संग्राम व सागर शिंदे यांच्या रिक्षाची बारकाईने पाहणी केली. त्यांनी सजवलेल्या रिक्षाचं व शिवप्रेमाचे कौतुक केलं.
व्यवसाय करताना शिवभक्ती जोपासलेल्या संग्राम शिंदे यांचे कौतुक अमोल कोल्हे यांनी केलं. कराडच्या संग्राम व सागर शिंदे हे रिक्षा व्यावसायिक बंधुंची शिवकन्या नावाची रिक्षा आहे. या रिक्षात व रिक्षावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास गडकोटासह सामावलाय.
रिक्षाबाहेर व आत देशातील राज्यातील परिचित अपरिचित महापुरुषांचे फोटो, इतिहासाची माहिती रेखाटली आहे. तसेच अनेक सामाजिक संदेश लिहिलेले आहेत.
रिक्षात वायफाय, फ्रिज,सॉनिटायझर, ऑक्सिजन सुविधा, लॅपटॉप फोन मेकपसह हळदी कुंकू, लहान मुलांसाठी चॉकलेट अशा अनेक सुविधा आहेत. समाजातील विविध घटकांना सैनिक, गरोदर माता, अपंग यांना मोफत प्रवास दिला जातो.
महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, विविध धार्मिक सण या दिवशी मोफत प्रवासासह भाड्यातही सवलत दिली जाते. या शिवकन्या रिक्षाने अनेक सुंदर रिक्षा स्पर्धा जिंकल्या आहेत.
व्यवसाय करताना सामाजिक हिताच्या भावनेतून शिवभक्ती जोपासली. रिक्षाच्या माध्यमातून शिंदे बंधुनी शिव इतिहास साकारला आहे.
पूर्वजांनी इतिहास जसा जपला तसा आपणही जपावा यासाठी प्रयत्न सुरु होते. ते या रिक्षाच्या माध्यमातून यशस्वी झाले असल्याचे संग्राम शिंदे यांनी सांगितलं.
अभिनेते खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालिकेतून महाराजांचा हतिहास सर्वांपर्यंत पोहचविण्याचे मोठे काम केलं. त्यांनी आमच्या रिक्षात बसावे, अशी इच्छा होती. ती पूर्ण झाली, अशी भावना सागर शिंदे यांनी व्यक्त केली.