सातारा : प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवार यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. कधीही एखाद्या कलाकाराने दुसऱ्या कलाकारावर आरोप करू नयेत. मात्र मी अशी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देतेय. गौतमी पाटील हे एकच नाव नाही. अशी वेगवेगळी तीन ते चार नावे आहेत. याच्यामुळे कलेचे विभत्स रूप समाजासमोर येत आहे. तुमच्या कलेचा रिस्पेक्ट तुम्ही किती ठेवता यावर सर्व काही आहे, असं मत माधुरी पवार यांनी व्यक्त केलं. अशा प्रकारांमुळे आताच्या मुलींना नृत्याचे धडे द्यायचे का नाही, हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. हे असं का होतंय, याची कारणे मी द्यायची गरज नाही. प्रेक्षकांना सर्व माहीत आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी बाहेर देशात असताना हे प्रकरण चर्चेत आलं. मात्र ज्यावेळी मी पाहिलं त्यावेळेस मी समजू शकते की एखाद्या वेळेस हे चुकू शकत. मात्र हे वारंवार होत असेल तर याला चूक म्हणता येत नाही, असंही माधुरी पवार यांनी सुनावलं.
कलाकाराने कधीही आपल्या कलेचा रिस्पेक्ट ठेवून आपली कला सादर करावी. लावणीचा दर्जा खूप मोठा आहे. मी त्याची धूळसुद्धा नाही. प्रेक्षकाच्या भावना समजून करमणूक केली पाहिजे. तुम्ही काहीही हातवारे केले म्हणजे करमणूक होत नाही, असं मत माधुरी पवार यांनी व्यक्त केलं.
सोशल मीडियामुळे आता घाणेरडी गोष्ट लवकर पसरते. अशा गोष्टी थांबवण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे की अशा गोष्टींना बंदी घालावी. एखादी गोष्ट चुकीची करून परत माफी मागायची आणि पुन्हा पुन्हा तीच चूक करायची म्हणजे हा गुन्हा आहे. हे प्रेक्षकांच्या लक्षात आले पाहिजे.
समाजकारण हे मला पहिल्यापासूनच आवडतं. कलाकारांसाठी जनता हा पक्ष आहे. सध्या तरी कोणत्याही पक्षाचे मी समर्थन करू शकत नाही. कारण प्रत्येक जण मला त्यांच्या कार्यक्रमासाठी बोलावत असतो. सध्या तरी कोणत्याही पक्षात जाण्याची नियोजित नाही. पण यापुढील काळात चांगले समाजकारण, राजकारण करण्याची इच्छा आहे, असंही माधुरी पवार यांनी सांगितलं.