सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळला. यावरून वातावरण तापलं आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री सतेज पाटील यांनी मालवणमध्ये जात घटनेची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याचं सरकार हे महायुती नाहीतर महागळती सरकार असल्याचं म्हणत सतेज पाटलांनी शिंदे सरकारवर टीकस्त्र डागलं आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळ्याने विरोधक आक्रमक झालेत. काँग्रेस नेते सतेज पाटलांनी सरकार टीका केलीय. केंद्र आणि राज्यातलं सरकार हे हे महायुती नाहीतर महागळती सरकार आहे! संसद, राम मंदिर, विमानतळ या ठिकाणी पावसाळ्यात पाणी गळतीच्या घटना घडल्या. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. ही तर संतापजनक आणि महाराष्ट्राला मागे नेणारी घटना आहे, असं सतेज पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत. संताप होतोय. पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे दिसतंय. उद्धघटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं होतं. इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड केली गेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतं? हे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे, असं सतेज पाटील म्हणाले.
देशात नौदलाचा वेगळा इतिहास आहे. पुतळा कोसळण्याचं कारण नौदलावर ढकलणं म्हणजे नौदलाचा अपमान करण्यासारखा आहे. आपटे नावाच्या व्यक्तीला काम देण्यासंदर्भात नौदलाला कोणी सांगितलं? कोणत्याही शास्त्रात न बसणार नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत का केलं गेलं? चूक झाली असेल तर शासनाने माफी मागावी मात्र हे नौदलावर ढकलू नये. नौदलाला बदनाम करू नका, असं सतेज पाटील म्हणाले.