बीडमधील खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळणार, वन विभागाला आढळल्या धक्कादायक गोष्टी

| Updated on: Mar 07, 2025 | 10:36 PM

आता सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेची माहिती घेत आहे.

बीडमधील खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळणार, वन विभागाला आढळल्या धक्कादायक गोष्टी
Follow us on

भाजपचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. त्याचे एकापाठोपाठ एक कारनामे सध्या बाहेर येत आहेत. खोक्या भोसलेने शिरुर कासार या ठिकाणी एका व्यक्तीला बॅटने मारहाण केली होती. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानतंर आता सतीश उर्फ खोक्या भाई याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर आता लवकरच सतीश भोसलेच्या मुसक्या आवळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शिरूर तालुक्यातील बावी गावातील महेश ढाकणे आणि दिलीप ढाकणे यांनी सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्या साथीदाराला हरणाची शिकार का करताय म्हणून अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यासह इतर सहा जणांनी दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना जबर मारहाण केली होती. याप्रकरणी काल 7 मार्च रोजी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हरीण आणि काळविटाचे सांगाडे जप्त

याप्रकरणी आज पाटोदा येथील वन अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांना या परिसरामध्ये मृत प्राण्याचे सांगाडे आढळून आले. हे सांगाडे हरीण आणि काळविटाचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. यापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या साथीदाराने अनेक हरण, ससे मारल्याचा आरोप होत आहे.

वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांना हरणाचे शिंग सापडले. त्यांनी ते जप्त केले असून फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवले आहे.

कडक शिक्षा झाली पाहिजे, वनप्रेमीची मागणी

याप्रकरणी वनप्रेमी सिद्धार्थ सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोप करणं आणि गुन्हा दाखल करणं यात फरक आहे. 200 हरणांची शिकार केली, असं कळलं पण तशी नोंद कुठे नाही. तशी घटना आपणास निदर्शनास आली नाही. या ठिकाणी तीन ते चार महिन्यांपूर्वी काळवीटाचे सांगाडे सापडले आहेत. जो कोणी यातील आरोपी असेल, त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. प्राणी मित्र संघटना यासाठी पाठीशी राहणार आहे. आम्ही शिकारीचे प्रकार रोखले आहेत. ज्या ठिकाणी पानवटे आहेत, त्या ठिकाणी परिभागाने विशेष बंदोबस्त लावला पाहिजे, अशी मागणी सिद्धार्थ सोनावणे यांनी केली.