चंद्रपूर : कोरोना (Corona) काळात सगळ्यात गोष्टी थांबल्या होत्या. त्यात जंगल सफारीचा ही समावेश होता. त्यामुळे अनेक पर्यटकांना जंगल सफारीचा अस्वाद घेता येत नव्हता. मात्र आता कोरोनानंतर यंदा हा निसर्गानुभव पुन्हा घेता येणार असल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. या बुद्धपौर्णिमेला मचाण (census) किंवा शास्त्रीय भाषेत Water Hole Censusचे आयोजन वनविभागाकडून राज्यभरातील जंगलात करण्यात आले होते. ज्यात चंद्रपूरच्या ताडोबा बफर भागातील 20 हुन अधिक पाणवठ्यांचा देखील समावेश करण्यात आला होता. ज्यात पाणवठ्यांवरील मचाणावर बसून वन्यप्राण्यांची संख्या नोंद करण्याचा उपक्रम होता. हा निसर्ग अनुभव उपक्रम उत्साहात पार पडला. बुद्धपौर्णिमेला (Buddhapurnima) आकाश हे अतिशय निरभ्र असतं आणि चंद्राच्या प्रकाशात वन्यजीव अतिशय स्पष्टपणे दिसत असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण राज्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यजीवांची संख्या मोजली जाते. चंद्रपूरच्या ताडोबा बफर भागातील 20 हुन अधिक पाणवठ्यांवर अशा प्रकारे वन्यजीव गणना करण्यात आली. यावेळी ताडोबा आणि प्रादेशिक जंगलात वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी देशभरातून पर्यटक झाले दाखल झाले होते. त्याची वनविभागाने जय्यत तयारी केली होती.
बुद्धपौर्णिमेला लख्ख चंद्रप्रकाशानं आकाश भरलेलं असतं. जंगलात किर्र आवाजात हा घुमत असतो. तर या वेळी जंगलात वन्यजीव पाणवठ्यावर येतात. तर या पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यजीवांना पाहण्यासाठी अनेक जन आपल्या नजर रोखून धरलेल्या असतात. राज्यातील सगळ्याच जंगलात हेच चित्र बुद्ध पौर्णिमेला पाहायला मिळालं. ते ही मचाण census किंवा शास्त्रीय भाषेत Water Hole Census च्या माध्यमातून. जे राज्याच्या वनविभागाने आयोजले होते. यासाठी दुपारपासूनच वनविभागाचे कर्मचारी आणि प्रशिक्षित गाईड्स त्यांना नेमून दिलेल्या मचानींवर गेले होते. तसेच बॅगमध्ये पोटापुरता खाऊ, टॉर्च, नोंदवही आणि इतर आवश्यक साहित्य हे हौशी वन्यजीव प्रगणकांना देण्यात आले होते.
जंगलातील पाणवठ्यांच्या शेजारी, उंच झाडांवर या मचाणी वन्यजीवाना चकवून अगदी बेमालूम पध्दतीने तयार केलेल्या असतात. जंगली प्राण्यांना मचाणीवरील माणूस दिसू नये पण मचाणीवरून प्राणी अगदी स्पष्ट दिसावा अशी याची रचना असते. वनविभागाने यासाठी जय्यत तयारी केल्याचे मोहर्लीचे वनपरिक्षेत्राधिकारी राघवेन्द्र मुन यांनी सांगितले.
तर संध्याकाळ होताच जंगलाच्या क्षितिजावर चंद्र उगवायला सुरुवात झाली. आणि संपूर्ण जंगल चंद्राच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालं. चंद्रपूर जिल्ह्यात निसर्ग अनुभव उपक्रमात मोठ्या प्रमाणात वन्यप्रेमींनी गर्दी केली होती. water hole census हे अभियान पूर्ववत झाले. याचा साहजिक आनंद झाल्याचे मत सहभागी एका पर्यटकांने मांडले.
तसेच अशा वन्यजीवगणनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना व हौशी वन्यजीव अभ्यासकांना या दुनियेत डोकावण्याची व तिची जवळून झलक पाहण्याची संधी मिळते. तर या दरम्यान करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांच्या नोंदी या अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरत असल्याची प्रतिक्रीय दुसऱ्या एका पर्यटकांने दिली आहे.