17 दिवसापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप, सैन्य, तटरक्षक दलालाही बॉडी सापडेना, अखेर…

| Updated on: Jun 23, 2024 | 8:17 PM

जेसीबी चालक राकेश यादव यांचा शोध अहोरात्र सरु आहे. परंतू त्यांचा काही थांगपत्ता लागलेला नाही. त्यांचे शोधकार्य सुरुच आहे. अखेर त्यांच्या कुटुंबियांना कंपनीने मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिला.

17 दिवसापासून मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप, सैन्य, तटरक्षक दलालाही बॉडी सापडेना, अखेर...
JCB driver's wife was given a relief check by the Chief Minister eknath shinde
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सुर्या प्रकल्पाचे काम सुरु असताना वर्सोवा खाडी जवळ भिंतीसह जमिन खचून जेसीबी चालक जेसीबी मशिनसह मातीच्या ढीगाऱ्यात गाडला गेला होता. सतरा दिवस त्याचा शोध सुरु होता तरीही त्याचा काही थांगपत्ता लागला. अखेर सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले. कोसळणारा पाऊस आणि इतर कारणांनी अजूनही त्याचा काही पत्ता लागलेला नाही. अशा बिकट प्रसंगात त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. हे शोधकार्य अजून सुरुच आहे. तत्पूर्वी मदत म्हणून या कुटुंबाला कंपनीने 50 लाखांची मदत आज केली आहे.

वर्सोवा खाडीजवळ झालेल्या दुर्घटनेत जेसीबीसह गाडला गेलेल्या ( राकेश यादव ) मजुराच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्याना हा धनादेश देण्यात आला. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने 35 लाख रुपये तर 15 लाख विम्याचे असे 50 लाखांचा धनादेश आज राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या वतीने वर्सोवा खाडीत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी जेसीबी ऑपरेटर असलेल्या राकेश यादव हे जेसीबीसकट मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते.

17 दिवसांनीही शोध सुरुच…

राकेश यादव बाहेर काढण्यासाठी 17 दिवस प्रयत्न करूनही त्याचा तपास होऊ शकला नाही अखेर याठिकाणी तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांना पाचारण केले. मात्र मुंबईत कोसळणारा पाऊसामुळे या बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी कुटूंबाला मदत म्हणून हा मदतनिधी आज त्यांच्या कुटूंबियांच्या हाती सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी एमएमआरडीएचे सहआयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्प प्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर आदी उपस्थित होते.