जातीभेद नष्ट करण्यासाठी भालचंद्र नेमाडेंनी सांगितला ठोस उपाय; म्हणाले, नवा पर्याय…

| Updated on: Dec 05, 2024 | 12:11 PM

Bhalchandra Nemade on Caste Discrimination : ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना क्रांतीअग्रणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा जातीभेद नष्ट करण्याबाबत भालचंद्र नेमाडे यांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर बातमी...

जातीभेद नष्ट करण्यासाठी भालचंद्र नेमाडेंनी सांगितला ठोस उपाय; म्हणाले, नवा पर्याय...
भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक
Image Credit source: tv9
Follow us on

आपण सध्या 21 व्या शतकात जगतो आहोत, मात्र तरी देखील जातीभेद, वर्णभेदासारख्या समस्या अद्यापर्यंत संपलेल्या नाहीत. समाजात असा भेदभाव आजही दिसतो. पण यावर काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे, त्या भेदाला आळा घातला पाहिजे, असं मत साहित्य वर्तुळातून व्यक्त केलं जात आहे. ‘हिंदू’, ‘कोसला’ असं दर्जेदार साहित्याचे लेखक, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी जातीभेदावर भाष्य केलं आहे. जातीभेद नष्ट व्हावा, यासाठी ठोस उपाय केला पाहिजे, असं मत भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीतील एका कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे बोलत होते.

नेमाडे यांचं जातनिर्मुलनावर मत काय?

आजचं सुरू असलेलं राजकारण हे जातीवर चाललं आहे. त्यामुळे जात निर्मूलनाची भाषा करण्या ऐवजी जातीभेद नष्ट करण्यासाठी संविधानातच व्यवस्था केली पाहिजे. जाती निर्मूलन करण्याच्या भानगडी पेक्षा जातीभेद नष्ट करून जाती टिकवण्यासाठी नवा पर्याय शोधला पाहिजे. तोपर्यंत जातही राहणारच आहे. त्यामुळे जाती निर्मूलनाची बकवास बंद केली पाहिजे. कारण जात ही जात नाही, उलट वाढत आहे, असं मत भालचंद्र नेमाडे यांनी मांडलं आहे.

भालचंद्र नेमाडे यांना क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे हे सांगलीत होते. सांगलीच्या कुंडलमध्ये त्यांना क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड पुरस्कार प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते जी. डी. बापू लाड पुरस्कार नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात सांगलीतील कुंडलमध्ये प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान समारंभ प्रसंगी नेमाडे यांनी जातीभेद निर्मूलनावर मत व्यक्त केलं.

गेल्या 25 वर्षांपासून क्रांती समूह आणि कुटुंबीयांच्या वतीने क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या नावाने हा पुरस्कार देण्याची परंपरा सुरू आहे. यंदा हा पुरस्कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.