अमरावती | 26 जानेवारी 2024 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील अनेक मान्यवर व्यक्तींचा, आपापल्या क्षेत्रात उत्म कामगिरी करत उत्तुंग शिखर गाठणाऱ्यांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहे. यावर्षी सरकारकडून 5 दिग्गजांसाठी पद्मविभूषण, 17 दिग्गजांना पद्मभूषण आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार मिळाले. 6 जणांना पद्मभूषण तर 6 जणांचा पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.
त्यांच्यापैकीच एक नाव म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर . बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
बेघर, अनाथ ,अपंग तसेच मतिमंद मुला-मुलींसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शंकर बाबा पापळकर यांच्या अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील आश्रमात निराधार मुला मुलींना आधार दिला जातो. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजसेवेला वाहून घेतलं असून अनेक अनाथ मुला मुलींचे पालकत्व स्वीकारल आहे. तसेच शंकर बाबा पापळकर यांनी अनेक मतिमंद मुला मुलींची शिक्षणाची जबाबदारी पार पाडली.
घेतले अनेकांचे पालकत्व
अमरावती जिल्ह्यातील वझर येथील 123 अनाथ मुलांचा सांभाळ करणारे शंकर बाबा पापळकर यांना नुकताच सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यासंदर्भात त्यांनी माध्यमांना माहिती दिली. शंकर बाबा पापडकर हे 1992 पासून अनाथ अपंग मतिमंद व दिव्यांग मुलांसाठी काम करत आहेत. रेल्वे स्थानक, बस स्टँड व अनाथालयात सोडून दिलेल्या 123 बेवारस मुलांना त्यांनी आत्तापर्यंत स्वतःचे नाव देऊन त्यांचे संगोपन केले, पालनपोषण केले. एवढेच नव्हे तर शंकर बाबांनी आतापर्यंत अनेक दिव्यांग मुला मुलींचे लग्न लावून त्यांचे संसार थाटात उभे करून दिले. निरपेक्षपणे, निरलसपणे गेल्या तीन दशकांपासून त्यांनी स्वत:ला या समाजकार्यात झोकून दिले असून समातील शेकडो मुलांचे ते पिता बनले आहेत. त्यांच्या याच कार्याचा सन्मान करण्यासाठी, त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. शंकर बाबा पापळकर यांना हा पुरस्कार मिळाल्याने विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
दिव्यांग मुलांसाठी मी माझं जीवन अर्पण केलं
1992 पासून मी हे कार्य करत आहे. बेवारस, दिव्यांग मुलांसाठी मी माझं जीवन अर्पण केलं आहे. 18 वर्षांची झाल्यानंतर ही मुलं कुठे जातील, त्यांचं कसं होणार याची मला खूप काळजी वाटते. त्यामुळे त्यांच्या भल्यासाठी कायदा व्हावा ही माझी तळमळ होती. आज मी हा पुरस्कार स्वीकारतो. त्या मुलांच्या भल्यासाठी काही करता येईल, यासाठी माझा प्रयत्न आहे, असे शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर म्हणाले.