नाशिक : नाशिक महानगर पालिका ( Nashik News ) कार्यक्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या काही दिवसांत किंवा तासात सुटाव्या यासाठी नाशिक महानगर पालिकेच्या माध्यमातून एनएमसी ई-कनेक्ट या अॅपची ( NMC E Connect ) निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे ( Tukaram Munde ) यांनी या अॅपची अंमलबजावणी जोरदारपणे राबविली होती. 7 दिवसांच्या आत अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तक्रार सोडवली नाहीतर आपोआपच त्याला नोटिस बजावली जायची. त्यामुळे मुंडे यांचा हा दणका नको रे बाबा म्हणत अधिकारी आणि कर्मचारी समस्या चुटकीसरशी सोडवत होते.
मात्र, तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यानंतर नागरिकांच्या समस्या प्रलंबित राहत आहे. खरंतर पालिकेत न येता एनएमसी ई-कनेक्ट या अॅपच्या माध्यमातून फोटो आणि माहितीच्या आधारे तक्रार करत होते, समस्या मांडत होते.
मात्र, मुंडे यांची बदली झाली आणि एनएमसी ई-कनेक्ट या अॅपच्या कारभाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. मुंडे यांच्या भीतीने कुठलीही तक्रार प्रलंबित राहणार नाही याची अधिक काळजी घेणारे अधिकारी आता त्या पोर्टलकडे बघायला तयार नाहीये.
सातशेहून अधिक तक्रारी पालिकेच्या पोर्टलवर प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या किंवा तक्रारीला एकप्रकारे अधिकारी कर्मचारी केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.
अनेक नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुकाराम मुंढे हेच अधिकारी पाहिजे होते, तक्रारी प्रलंबित कुणी ठेवल्या नसत्या अशीही चर्चा करत नाराजी व्यक्त करत आहे. अनेक अधिकारी हे दुपारच्या वेळेला पालिकेत भेटत नसल्याची ओरडही नागरिक करू लागले आहे.
खरंतर सध्या नाशिक महानगर पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नसल्याने लोकप्रतिनिधी यांचीही ढवळाढवळ नाहीये तरी देखील कामात अधिकाऱ्यांची दिरंगाई का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक महानगर पालिकेने तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी खरंतर स्मार्ट नाशिक नावाने अॅप सुरू केले होते. तेव्हापासून ही ऑनलाइन सुविधा खरंतर सुरू झाली आहे. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने नाशिककरांना जुन्या अधिकाऱ्यांची आठवण येत आहे.
सध्या नाशिक महानगर पालिकेच्या पोर्टलसह महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर सव्वा सातशे पेक्षा अधिक तक्रारी प्रलंबित असल्याने नागरिक संताप व्यक्त करत असून अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे. त्यामुळे पुढील काळात या प्रलंबित तक्रारी पालिका सोडविणार की नाही हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.