Special Report : शहाजी बापूंचा बंगळूर दौरा चर्चेत, 8 दिवसात घटविलं इतके किलो वजन

| Updated on: Jan 02, 2023 | 11:56 PM

पंचकर्म म्हणजे थोडक्यात ५ वेगवेगळ्या प्रक्रियांची एक आयुर्वेदिक उपचारपद्धती. पहिलं कर्म वमन...ज्यात श्वसन मार्गाची शुद्धी होते.

Special Report : शहाजी बापूंचा बंगळूर दौरा चर्चेत, 8 दिवसात घटविलं इतके किलो वजन
Follow us on

मुंबई : गुवाहाटी दौऱ्यानंतर शहाजी बापूंचा बंगळुर दौरा चर्चेत आहे. फक्त ८ दिवसात शहाजी पाटलांनी ९ किलो वजन घटवलंय. नेमकं हे कसं झालं., फक्त ८ दिवसात शहाजी पाटलांनी नेमकं काय केलं. गुवाहाटीच्या दौऱ्यानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील आता बंगळूरच्या दौऱ्यानं चर्चेत आहेत. गुवाहाटी दौऱ्यात शहाजी पाटलांनी राजकीय वजन वाढवलं, आणि आता बंगळूर दौऱ्यावरुन ते 9 किलो वजन
घटवून परतले आहेत. शहाजी पाटलांचं 125 किलो वजन होतं. आता ते 116 किलोवर आलंय. फक्त 8 दिवसात शहाजी पाटलांनी ९ किलो वजन कमी केलंय. शहाजीबापू पाटील मागच्या ९ दिवसांपासून बंगळूरमधल्या श्री.श्री.रवीशंकर यांच्या आश्रमात होते. तिथं त्यांनी पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करून ९ किलो वजन कमी केलं.

 

पंचकर्म म्हणजे थोडक्यात ५ वेगवेगळ्या प्रक्रियांची एक आयुर्वेदिक उपचारपद्धती. पहिलं कर्म वमन…ज्यात श्वसन मार्गाची शुद्धी होते. यातून दमा, सोरायसिससारखे आजार बर होतात. दुसरं कर्म विरेचन. यात जठरापासून ते उत्सर्जन संस्थेपर्यंत शुद्धी होते. यामुळे अॅसिडीटी, हार्मोनल विकारांवर नियंत्रण येतं. तिसरं कर्म नस्यम. नाकाद्वारे औषधं सोडून श्वसनाची शुद्धी होते. यानं सर्दी, नाकदुखी आणि घोरण्याचा त्रास कमी होतो. चौथं कर्म अनुवासन. तेलाद्वारे पोटातील वायू आणि इतर फॅट्स कमी केले जातात. यामुळे पाठदुखी, पाय आणि झोपेच्या विकारांवर नियंत्रण येतं. आणि पाचवं कर्म म्हणजे अस्थापन. यात पोटातील मोठे आतडे साफ करण्यासाठी काढ्याचा वापर होतो. यामुळे बद्धकोष्टता आणि संधिवातापासून दिलासा मिळतो.

वेळी-अवेळी जेवण आणि चुकीच्या खाद्यसंस्कृतीनं पचनशक्ती क्षीण होते. ज्यामुळे शरिरात वायू आणि इतर विकारांनी जडत्व येतं. पंचकर्म त्यावर फायदेशीर ठरतं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींचं याआधीचं वजन 135 किलो होतं. आता गडकरींचं वजन 93 किलो आहे. 2014 सालातले गडकरींचे फोटो आणि आत्ताचे फोटो जर बघितले. तर गडकरींचं घटलेलं वजन सहज लक्षात येतं.

 

आरोग्याबाबत सतर्क असणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रात रावसाहेब दानवे अव्वल आहेत. वय 67. दानवे नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करतात. अजित पवार. वय 63. रोज ४ ते ५ किलोमीटर धावतात. वेळेत झोप आणि सकाळी लवकर उठण्यात पवारांचा शिरस्ता आहे.

ज्योतिरादित्य शिंदे, राहुल गांधी, किरेन रिजीजू, नाना पटोले हुसुद्धा फिटनेसबाबत जागृत आहेत. व्यायाम आणि आहारावर त्यांचा भर असतो. एरव्ही दर नव्या वर्षात असंख्य लोक वजन घटवण्याचा संकल्प करतात. जीम-योगाचे क्लास लावतात. मात्र शहाजी पाटील वर्षाच्या सुरुवातीलाच ९ किलो वजन घटवून महाराष्ट्रात परतले आहेत.