नाशिक : लोकसभा 2024 च्या देशातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होत आहे. महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात एकूण 13 जागांवर सकाळी सात वाजल्या पासून मतदान सुरु झाले आहे. मतदारांचा उत्साह दांडगा आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासून विविध मतदार संघात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघात दुपारी एक वाजेपर्यंत 28.51 टक्के मतदान झाले आहे. यातच आता नाशिक लोकसभा मतदार संघात नवाच वाद निर्माण झाला आहे. येथील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांनी मतदान कक्षाला हार घातल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील ईव्हीएम कक्षाला हार घालून त्याची पूजा केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
नाशिक लोकसभा मतदार संघात यावेळी तिरंगी मुकाबला आहे. नाशिक लोकसभेच्या जागे सुरुवातीला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे छगन भुजबळ इच्छुक होते. परंतू महायुतीत ही जागा कोणाला सोडायची याचा निर्णय होईना म्हणून भुजबळ यांनी माघार घेतली. त्यानंतर अखेर शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या वर्षा निवासस्थानी शक्ती प्रदर्शन केले. त्यानंतर अखेर नाशिकचे तिकीट गोडसे यांनी मिळविले. मात्र, त्यांच्या विरोधात ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिले आहे. तर बडे प्रस्थ असलेल्या शांतिगिरी महाराज यांनी देखील हट्टाने अपक्ष म्हणून येथून अर्ज भरल्याने शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आणि हिंदू मतदारांचा शांतिगिरी महाराजांना आधार मिळाला तर हेमंत गोडसे अडचणीत येणार असल्याचे म्हटले आहे.
शांतिगिरी महाराजांना आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यापूर्वी हार घालून नमस्कार केला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला आहे. आपण ईव्हीएम मशिनला हार घातला नाही तर मशिनच्या बाहेर लावलेल्या भारत मातेच्या फोटोला हार घातल्याचे स्पष्टीकरण शांतिगिरी महाराज यांनी केले आहे. माझे हे कृत्य नियमांचे उल्लंघन आहे याची आपल्याला कल्पना नव्हती. नियम तोडण्याचा माझा उद्देश नव्हता. निवडणूकांत पैसे आणि दारू वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही. आमच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे. आमच्या विरोधात हे कारस्थान असल्याचे शांतिगिरी महाराज यांनी सांगितले.
शांतिगिरी महाराज यांच्या सहकार्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. शांतिगिरी महाराजांचा सहकारी मतदान केंद्रावर महाराजांच्या नावाच्या चिठ्ठ्या वाटताना आढळला. या प्रकरणात म्हसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून म्हसरूळ पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याची माहीती सूत्रांनी दिली.