सांगली । 13 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल पुण्यात गुप्त भेट झाली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर आलेला नाही. तर, शरद पवार यांनी भेट झाली. घरातील वडीलधारी माणसांना भेटण्यासाठी कुणीही येऊ शकते. अजित पवार माझा पुतण्या आहे असे सांगत नवी राजकीय गुगली टाकली आहे. त्याचवेळी जयंत पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांना घरचा आहेर दिलाय.
ठाण्यात जी घटना घडली ती अतिशय गंभीर अशी घटना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातच हॉस्पिटलची यंत्रणा कुचकामी ठरलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात दवाखान्याबद्दल मोठे मोठे पोस्टर लावले. “आपला दवाखाना” घोषणा केल्या. पण, त्याआधी त्यांनी आपल्या गावातील ‘आपला दवाखाना बघितला पाहिजे होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी ठाणे शहरातील दवाखाने सुधारले पाहिजेत.’ अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
आतताईपणाने कोणती पावले न टाकता सामंजस्याने जर काही होत असेल तर प्रयत्न करायचा असे जयंत पाटील यांनी कालच्या भेटीबाबत भाष्य केलं आहे. पण आता प्रयत्नापेक्षा काम पुढे गेले आहे. त्यामुळे मी प्रयत्न करून बघितला. आता पाहू. पंरतु, त्या प्रयत्नाचे काही उत्तर मिळेल याचे आज तरी आम्हाला काही वाटत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे जो काही निर्णय होईल तो होईल. लढाई सुरु झाली आहे जे व्हायचं आहे ते होणार आहेच. राजकारणात बेरजेचं राजकारण करायचं असतं. भागाकर आणि वजाबाकी होऊ नये याचा प्रयत्न कोणत्याही पक्ष अध्यक्षांनी करायचा असतो. मी तेच केलं असे पाटील म्हणाले. कोणीही शहाणा माणूस घरातला वाद घरातच संपावण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे मी प्रयत्न केले असे ते म्हणाले.
संभाजी भिडे यांनी महत्तम गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केले. ते चुकीचे आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करणे आणि विनाकारण बोलणं मला व्यक्तिशः चुकीचं वाटतं. निवडणूक जवळ आल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जेणेकरून जाती – जातीमध्ये संघर्ष निर्माण व्हावा,असा अनेकांचा प्रयत्न दिसत आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.