तब्बल 18 वर्षांनी शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा, पहिला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता

| Updated on: Sep 23, 2024 | 12:54 PM

तब्बल १८ वर्षांनी शरद पवार यांची चिपळूणध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

तब्बल 18 वर्षांनी शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा, पहिला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता
शरद पवार
Follow us on

Sharad Pawar Chiplun Rally : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे. त्यात आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सध्या चिपळूणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल १८ वर्षांनी शरद पवार यांची चिपळूणध्ये जाहीर सभा होत आहे. त्यामुळे शरद पवार काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

शरद पवार यांची चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर आज ही सभा होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी पक्षाचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्या या सभेची तयारी प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी केली आहे. या सभेतून खासदार शरद पवार निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. या सभेपूर्वी शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर ते सावरकर मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे.

विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा

शरद पवार यांच्या चिपळूण मधील सभेला प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. चिपळूणसह इतर अनेक तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सभास्थळी जमले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. या सभेपूर्वी शरद पवारांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भावनाला भेट दिली. यावेळी पतसंस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनी शरद पवार यांची चिपळूणमध्ये भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे भास्कररराव जाधव म्हणाले.

शरद पवार हे या चिपळूण दौऱ्यात माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी तसेच यादव यांच्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट देणार आहेत. या जाहीर सभेत शरद पवार हे शेतकरी, कामगार, मजूर, मच्छीमारांसह विविध घटकांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या जाहीर सभेसाठी प्रथमच सभा मंडपात गॅलरी उभारण्यात आली आहे.

18 वर्षांनी शरद पवार चिपळूणमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघासाठी प्रशांत यादव यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे. याआधी शरद पवारांची 18 वर्षांपूर्वी चिपळूणमध्ये जाहीर सभा पार पडली होती. भास्करराव जाधव यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी 18 वर्षापूर्वी चिपळूणमध्ये पवारांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता 18 वर्षांनी शरद पवार हे चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे या सभेत खासदार शरद पवार नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.