Sharad Pawar Z Plus Security : राष्ट्रवादी पवार गटाचे नेते शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता शरद पवारांनी ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. मला तुर्तास केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेली झेड प्लस सुरक्षा नको. आधी मला कोणता धोका आहे तो बघतो आणि नंतर काय ते ठरवतो, असे शरद पवारांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले.
काल शरद पवारांची दिल्लीत सुरक्षा यंत्रणांमधील अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते. यावेळी शरद पवारांना वाय दर्जाची सुरक्षा वाढवून ती झेड प्लस करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून शरद पवारांची सुरक्षा वाढण्यामागचे कारण गुप्त ठेवले होते.
त्यावर शरद पवारांनी मला या झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी मान्य नाहीत. मी स्वतः मला आधी कोणत्या प्रकाराचा धोका आहे का, ते पडताळून पाहीन. त्यानंतर झेड प्लस सुरक्षा घ्यायची की नाही यावर निर्णय घेईन, असे सांगितले. तसेच शरद पवार यांनी माझ्या जिवाला कोणत्या गोष्टींमुळे धोका निर्माण होऊ शकतो, असे वाटते त्या सर्व संभाव्य धोकादायक बाबींची यादी दिल्लीत सुरक्षा यंत्रणेने द्यावी, असेही म्हटले.
तसेच या नव्या सुरक्षा व्यवस्थेतील अटी मान्य नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. याआधीसुद्धा शरद पवारांना झेड प्लस सुरक्षेसाठी विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी ती नाकारली होती. तसेच गृहमंत्रालयाकडून शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाच्या भिंतीची उंची वाढवावी, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासोबतच 50 सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात असतील, सुरक्षा दलाकडून दिलेली गाडीच वापरावी लागेल, असा आग्रही शरद पवारांकडून करण्यात आला. मात्र घराच्या आतमध्ये सुरक्षाकडे नको, अशी सूचना शरद पवार यांनी दिली.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अति-महत्वाच्या व्यक्तींना X, Y, Y Plus, Z, Z Plus दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येते. या सुरक्षा यंत्रणेत मनुष्य बळ आणि वाहनांच्या ताफा यात काही मुलभूत फरक असतो. या व्यतिरिक्त आणखी एक एसपीजी सुरक्षा पुरविली जाते. ही सुरक्षा केवळ देशांच्या पंतप्रधानांना पुरविली जाते. त्यानंतर झेड प्लस दर्जाच्या सुरक्षा श्रेणीचा क्रमांक लागतो. प्रत्येक दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेतील ताफ्यात असणाऱ्या जवांनाची संख्या वेगवेगळी असते.