राज्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकांनतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा घेतला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वत: त्याबद्दलची घोषणा केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो होईल, अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
‘टीव्ही 9 मराठी’ने नुकतंच शशिकांत शिंदे यांनी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संजय राऊतांनी महापालिका निवडणुकांसाठी एकला चलो रे चा नारा दिला आहे, त्याबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. जर त्यांनी पक्षवाढीसंदर्भातून काही निर्णय घेतला असेल तर त्यांच्याबाबतची त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. पण याबद्दल वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
“जर त्यांनी पक्षवाढीसंदर्भातून काही निर्णय घेतला असेल तर त्यांच्याबाबतची त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. लोकसभा, विधानसभेला त्यांच्यासह आमच्याकडेही अनेकांची इच्छा असते की आम्हाला संधी मिळावी. पण ती संधी मिळत नसल्याने कार्यकर्त्यांच्या मनात नाराजीचा सूर असतो. आपण इतकी मेहनत करुनही आपल्याला ही संधी मिळत नाही, म्हणून काही जण नाराज असतात. सहाजिकच जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती या निवडणुका आल्या आणि खाली बेस जर मजबूत असेल तर पक्षालाही त्याचा फायदा होतो”, असे शशिकांत शिंदे म्हणाले.
“आज मला वाटतं की महायुतीदेखील अशाचप्रकारे स्वत: एकटं लढण्याचा प्रयत्न करेल, असं वाटत नाही. त्यांचा काय निर्णय होईल. परंतु आघाडीच्या माध्यमातून भूमिकेतून मला वाटतं त्यांनी ही भूमिका घेतल्याचे दिसत आहे. वरिष्ठ नेते चर्चा करतील. प्रत्येक पक्षांनी ही भूमिका घेताना महाविकासआघाडीने एकत्र येऊन नेत्यांनी समन्वय ठेवायला हवा. त्यात सरकारच्या चुकीच्या धोरणांवर आक्रमक भूमिका घ्यायला हवी. यानंतर सत्तास्थापनेवेळी पुन्हा एकदा महाविकासआघाडी एकत्र आली तर काहीही अडचण येणार. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो होईल”, असे शशिकांत शिंदेंनी म्हटले.
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.