कोल्हापूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी द काश्मीर फाईल (kashmir files) सिनेमावरून पुन्हा एकदा भाजपवर (bjp) टीका केली आहे. सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी भूमिका आणि वक्तव्य सत्ताधाऱ्यांनी केली आहे. समाज एकसंघ ठेवला पाहिजे, देश पुढे न्यायचा असेल माणसा माणसात, जातीजातीत, धर्माधर्मात एकवाक्यता एकसंघता हवी. फूट नको. आपण भारतीय आहोत ही भावना असली पाहिजे. पण आपण भारतीय आहोत ही भावना रुजवण्याऐवजी धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे, असं सांगतानाच गुजरातमध्ये तर यापेक्षा भयाण हिंसा झाली होती. रेल्वेचे डबे पेटवले होते. शेकडो लोकं मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी त्या राज्याचे प्रमुख कधी पुढे आलेले हे आमच्या ऐकिवात नाहीये, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधून हा हल्लाबोल केला आहे. काश्मिर पंडितांवर अत्याचारावर हा सिनेमा काढलाय. पण ही घटना कधी घडली हे पाहिलं पाहिजे. या सिनेमातून अन्य धर्मीयांच्या माणसाबद्दल संताप येईल. शेवटी काही लोकांनी कायदा हातात घ्यावा असं गणित तर करायचं नाही, तसं काही तरी चित्रं दिसतं, असा संशय पवारांनी व्यक्त केला. हा सिनेमा कोणत्या काळातील आहे. काश्मीरमधून पंडित बाहेर पडले. हे घडलं तेव्हा राज्यकर्ते कोण होते? त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं असं सांगितलं जातं. पण त्यावेळी व्हीपी सिंग यांचं सरकार होतं. भाजपचा त्यांना पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद भाजपच्या पाठिंब्याने गृहमंत्री होते. त्या ठिकाणी राज्यपाल नेमलं त्या व्यक्तीचं धोरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने योग्य नव्हतं. जेव्हा राज्यपाल नियुक्तीचा प्रश्न आला तेव्हा फारूख अब्दुल्ला यांनी राजीनामा दिला आणि ते सत्तेपासून बाजूला गेले. त्यांच्या हातात राज्याची सूत्रं, त्यांची राजवट असताना काश्मीर पंडितांवर हल्ले झाले, असंही पवार यांनी सांगितलं.
पाकिस्तानच्या बाजूने अनुकूल असलेल्या काश्मीरमधील एका वर्गाने हे हल्ले केले. पाकिस्तानबरोबर जायचं नाही अशी भूमिका मांडणाऱ्या मुस्लिमांवरही त्यावेळी हल्ले झाले. भारताबरोबर राहायचं अशी भूमिका मांडणाऱ्या मुस्लिमांवरही हल्ले केले. त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची होती. ते भाजपवाले होते. तेव्हा भाजपने काहीच केलं नाही. उलट तिथल्या हिंदूंना जाण्यास मजबूर केलं. तुम्ही बाहेर जा म्हणून सांगितलं. इतकंच नाही तर त्यांना साधनं दिली. गाड्या दिल्या. त्यांना जायला प्रोत्साहित केलं. हा इतिहास असताना अशी थिअरी मांडणं सत्यावर आधारीत नाही, असा दावाही त्यांनी केला.
ही थिअरी जातीवाद वाढवणारी आहे. द्वेष वाढवणारी आहे. अशी फिल्म निघाल्यावर ती पाहिलीच पाहिजे असं देशाचे प्रमुख बोलायला लागले आणि सत्ताधारी तिकीटं देऊन लोकांना मोफत सिनेमा दाखवायला लागले याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ एकच आहे. सांप्रदायिक विचार पेरून माणसात दुही माजवून त्याचा फायदा घ्यायचा. आता कोल्हापुरात बाय इलेक्शन आहे. त्यात हा सिनेमा नक्की दाखवतील. असल्या सर्व गोष्टींवर त्यांचा भरवसा आहे. त्यांचा कामावर नाही. लोकांचा प्रश्न सोडवण्यावर नाही, जनमाणसात विषारी भावना वाढवण्यावर त्यांचा भर आहे, असा घणाघाती हल्लाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray दर पाच वर्षांनी आपला रंग बदलतात, यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही – जितेंद्र आव्हाड