शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. विरोधकांनी अर्थातच या अर्थसंकल्पावर निवडणुकीचा जुमला म्हणून शिक्का मारला. कोल्हापूरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पण अर्थसंकल्पावर टीका केली. खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे? असा हिशेबच शरद पवारांनी काढला. हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा असल्याचे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा
प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टींची अर्थसंकल्पात मांडणी करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले. महसूल तूट, एकंदर लागणारी आवश्यकता, या तीन गोष्टींची आकडे बघितले तर अपेक्षापेक्षा किती तरी कमी तरतूद असल्याचे दिसून येते. एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना काही तरी भयंकर करतो हे दाखविण्याचा प्रकार असल्याचा टोला पवारांनी लगावला. माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या गोष्टी मांडण्यात आल्या असल्या तरी त्याची अंमलबजावणी कितपत होईल, यावर त्यांनी शंका घेतली.
एखाद्या गोष्टीला 100 रुपये खर्च असेल आणि माझ्या खिशात 70 रुपये असेल तर मग खर्च कसा करणार असा सवाल त्यांनी केला. तुमच्याकडे महसूली जमा किती आहे. महसूली खर्च किती होणार आहे, जरुरीपेक्षा जास्त खर्चाचा गॅप कसा भरणार हे न सांगता आम्ही करु या म्हणण्याला फारसा काही अर्थ उरत नसल्याचे ते म्हणाले. त्यांनी एकंदरीतच हा अर्थसंकल्प विधानसभेच्या तोंडावर केलेला हा शब्दांचा फुलोरा असल्याची टीका केली.
आमची आघाडी हाच आमचा चेहरा
संजय राऊत यांनी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत बिनचेहऱ्याने जाणे धोक्याचे ठरेल आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव रेटले होते. त्यावर आमची आघाडी हाच आमचा चेहरा असल्याचे शरद पवार यांनी सुनावले. एका व्यक्तीने नाही तर आघाडीतील सर्व नेते एकत्रित निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्री चेहऱ्याची चर्चा एकत्रित बसून करणार असल्याचे सांगितले.
अजून निर्णय नाही
गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. अनेक आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृ्त्वात महायुतीत सामील झाले. त्यातील अनेक आमदार परत येण्याची तयारी करत आहे. त्यावर शरद पवार यांना विचारण्यात आले. याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील असे ते म्हणाले. पत्रकारांना अशा आमदारांची नावे माहिती असतील तर ती सांगावी, असे चिमटा ही त्यांनी काढला.
मोदींनी सभा घ्याव्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही सभा घ्याव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. लोकसभेला 48 पैकी महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. त्यात मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या. तिथे महाविकास आघाडीला यश मिळाले. त्यामुळे विधानसभेला मोदींनी अधिक सभा घ्याव्यात. त्याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल, असा टोला त्यांनी लगावला.