कोल्हापूर: राज्यात भोंग्याचा (loudspeaker ban) मुद्दा तापलेला असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भोंग्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर (central government) बोट ठेवलं आहे. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना मुलभूत प्रश्न सोडवता येत नाहीत. त्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी धर्माच्या मुद्द्याचा आधार घेतला जातोय, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. शरद पवार यांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भोंग्यासह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. इश्यू महागाईचा आहे, बेकारीचा आहे. प्रत्येक गोष्टीची किंमती वाढतायत. स्टीलचे भाव वाढलेत. इंधन महागलंय. ज्याच्याकडे गाडी आहे, त्याला फक्त इंधन महागल्याचा त्रास होतो असा नाहीये. तर भाजी महागते, सगळंच महागतं. केंद्र याकडे गांभीर्यानं बघायला तयार नाही. याविरोधात चळवळी उभ्या राहतील, असंही भाकीतही शरद पवार यांनी यावेळी केलं.
शरद पवार यांनी यावेळी राजद्रोहाचं कलम नसावं याचा पुनरुच्चार केला. 124 अ कलमात राजद्रोहाचा खटला दाखल करण्याची तरतूद आहे. इंग्रजांच्या काळात तयार करण्यात आलेलं कलम आहे. ब्रिटीश सत्तेविरोधात बोलणाऱ्यांना हे कलम लावलं जात होतं. आता आपण स्वतंत्र झालो आहोत. आता सरकारच्या विरोधात, त्यांच्या न पडलेल्या धोरणांविरोधात बोलण्याचा अधिकार लोकशाहीत जनतेला आहे. राजद्रोहाबाबत सुप्रीम कोर्टात एक केस सुरू आहे. अनेक वकिलांनी यात भाग घेत या कलमाला विरोध केला आहे. केंद्र सरकारनंही या कलमाचा फेरविचार करणार असल्याचं म्हटलं आहे. केंद्राने असं म्हटलं असेल, तर ते योग्यच आहे, असं पवार यांनी सांगितलं.
राजद्रोहाचं कलम रद्द करण्यास आधी केंद्र सरकारने विरोध केला होता. परंतु, सुप्रीम कोर्टानं मांडलेल्या भूमिकेनंतर आता केंद्रानं याबाबत कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं आहे. 1890 सालचा कायदा आजच्या परिस्थितीत सोयीचा असेलच असं नाही. कायद्यात सातत्यानं यात काम करावं लागतं. संसदेत त्यासाठी काम केलं जातं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे हे अयोध्या दौऱ्याला जात आहे. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशात प्रचंड विरोध होत आहे. त्याबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावर अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही, असा टोला त्यांनी लगावला. माझा नातूही अयोध्येत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.