सर्वात मोठी बातमी | उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार मैदानात, दिल्लीतल्या ‘त्या’ बैठकीत काय घडलं? सावरकरांचा मुद्दा काँग्रेस वगळणार?

| Updated on: Mar 28, 2023 | 9:54 AM

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्दयावरून महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचं दिसताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्व शरद पवार मैदानात उतरल्याचं दिसतंय.

सर्वात मोठी बातमी | उद्धव ठाकरेंसाठी शरद पवार मैदानात, दिल्लीतल्या त्या बैठकीत काय घडलं? सावरकरांचा मुद्दा काँग्रेस वगळणार?
Image Credit source: social media
Follow us on

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची चिन्ह दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. भाजप आणि शिंदें समर्थित शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना सावरकरांविषयीच्या भूमिकेवरून कोंडीत पकडण्याचं पूर्ण प्लॅनिंग केलंय. उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र महाविकास आघाडी वाचवण्यासाठी शरद पवार यांचीच पुढाकार घेतल्याची माहिती हाती आली आहे. नवी दिल्लीत विरोधकांच्या झालेल्या बैठकीत शऱद पवार यांनी हा मुद्दा काँग्रेस नेत्यांसमोर मांडला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती टीव्ही9 ला दिली आहे. त्यामुळे आता पवारांच्या राहुल गांधी सावरकरांचा मुद्दा टाळण्याची शक्यता आहे.

सावरकरांवर शरद पवार काय म्हणाले?

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेने वीर सावरकर यांच्याबाबत परस्पर विरोधी भूमिका घेतली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट करता उद्धव ठाकरे यांनी सावरकरांना अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला. तर काँग्रेसदेखील माफीवीर या वक्तव्यावर ठाम आहे. आता शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका प्रथमच स्पष्ट केली आहे. सावरकर आणि RSS यांचा संबंध नाही. ते विज्ञानवादी होते. त्यामुळे त्यांना माफीवीर म्हणून हिणवनं योग्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या वादात राष्ट्रवादीचीही भूमिका स्पष्ट झाली आहे.

दिल्लीतल्या बैठकीत काय घडलं?

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरिता विरोधी पक्षांची एक बैठक काल दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधीही उपस्थित असल्याचं सांगण्यात येतंय. महाराष्ट्रात सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत बिघाडी होतेय, हा मुद्दा शरद पवार यांनी मांडला. सावरकरांचा मुद्दा सोडून इतर अनेक विषय आहेत. यावर बैठकीला उपस्थित खासदारांनीही सहमती दर्शवली.तसेच राहुल गांधी यांनीही पवारांच्या मताचा मी आदर करतो असं बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेस नेते आता सावरकर यांच्या मुद्द्याला बगल देणार असल्याचं म्हटलं जातंय.