Sharad Pawar : शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नका, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

| Updated on: Sep 04, 2024 | 9:45 AM

राज्यकर्त्यांकडून शिवरायांबाबत वेगळी विधानं केली जात आहेत. खोटा इतिहास हा जनतेसमोर, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांना टोला हाणला.

Sharad Pawar : शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नका, शरद पवारांनी ठणकावून सांगितलं
Follow us on

शिवरायांनी सुरतेची लूट केली नसून त्यांनी सुरतेवर आक्रमण केल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. तो मुद्दा उटलून धरत विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. आधी जितेंद्र आव्हाड, नंतर संजय राऊत आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या मुद्यावरून फडणवीसांवर आणि सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ वस्तुस्थिती वेगळी असताना, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं. आणि त्यामध्ये त्यांनी असं ध्वनित केलं की अशी लूट करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं नव्हतं. आणि चुकीच्या पद्धतीन इतिहास मांडण्याचं काम केलं जात आहे. ‘ असं शरद पवार म्हणाले. राज्यकर्त्यांकडून शिवरायांबाबत वेगळी विधानं केली जात आहेत. खोटा इतिहास हा जनतेसमोर, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज निर्माण होतात, असे म्हणत शरद पवार यांनी फडणवीसांना टोला हाणला.

शिवाजी महाराजांनी एकदा नव्हे दोनदा सूरतेवर स्वारी केली होती, असं इतिहासकार सांगतात. , ती स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, असं पवार म्हणाले.

शिल्पकाराला अुनभव कमी, एवढं मोठं काम देणं योग्य नव्हतं

राजकोट किल्ल्यावरील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्या पुतळ्याचं काम ज्यांना दिलं, त्या व्यक्तीचं (जयदीप आपटे) या क्षेत्रातील अनुभव अत्यंत मर्यादित होता. एवढं मोठं (पुतळ्याचं) काम त्याने कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना, त्याच्यावर ही जबाबदारी टाकणं , एवढं मोठं काम देणं हे योग्य नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

वाऱ्याच्या वेगामुळे किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असं कारण मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक सांगत आहेत. पण अनेक ठिकाणी महाराजांचे पुतळे आहेत.मुंबईत इंडिया गेटच्याजवळ, समुद्रकिनारी जो पुतळा आहे तो कित्येक वर्षांपासून उभा आहे, त्याला काही झालेलं नाही. त्यामुळे मालवणमध्ये जो पुतळा कोसळला,त्याबाबत जी कारण सांगितली जात आहेत, ती योग्य आहेत असं दिसंत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी सरकारला फटकारलं.

महामहोपाध्याय फडणवीसकृत इतिहास बदलायला निघालेत, संजय राऊतांचे टीकास्त्र

यापूर्वी शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं होतं. ‘शिवरायांचा नवा अपमान, महामहोपाध्याय फडणवीसकृत’ या शीर्षकाखाली सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर राऊतांनी हल्लाबोल केला. ‘मोगलांच्या आर्थिक नाड्या तोडण्यासाठी सुरत लुटायला हवी हे महाराजांचे धोरण होते व त्यानुसार सुरतवर स्वारी करून महाराजांनी दाणादाण उडवली, हे ऐतिहासिक सत्य असताना महामहोपाध्याय फडणवीस शिवरायांचा नवा इतिहास मांडून काय साध्य करीत आहेत? म.म. फडणवीस यांना शिवरायांचे शौर्य मान्य नसावे, हे पहिले किंवा सुरत महाराष्ट्राच्या राजाने लुटली ही जखम सध्याच्या गुजराती व्यापार मंडळास अस्वस्थ करीत असेल. त्यामुळे सुरत लुटीशी शिवरायांचा संबंध नसल्याची बतावणी म.म. देवेंद्र फडणवीस यांनी केली असावी,’ असं अग्रलेखात म्हटलं होतं. ‘ छत्रपती शिवरायांनी सुरत लुटली नाही असा जावईशोध देवेंद्र फडणवीस यांनी लावला. शिवरायांचा मर्दानी इतिहास संपविण्यासाठी फडणवीस यांनी सुरू केलेल्या मोहिमेचाच हा एक भाग आहे. शिवराय व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचा आणखी एक अपमान करण्याचा प्रमाद देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. छत्रपतींचा रोज एक अपमान करावा असे धोरण फडणवीस व त्यांच्या भाजपने स्वीकारले आहे काय?’ असा खोचक सवालही सामनातून विचारण्यात आला होता.