राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वार वाहत आहे, आता विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्ये काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभेचा धडका लावला आहे. आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तोफ धडाडली. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर ही येवल्यात शरद पवार यांची पहिलीच सभा आहे, त्यामुळे छगन भुजबळ यांच्याबाबत शरद पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
राष्ट्रवादीत मोठी फूट पडली, अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी छगन भुजबळ यांनी देखील शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पहिल्यांदाच येवल्यामध्ये शरद पवार यांची सभा झाली, या सभेत बोलताना शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना चांगलंच झोडपून काढलं. मला, पक्षाला, सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं, आता त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. येवल्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुजबळांना विधानसभा, विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले. पण त्यांनी नको ते उद्योग केले त्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं. त्यांना तिथे कोणी भेटायला देखील येत नव्हतं. मी आणि माझी मुलगी त्यांना भेटण्यासाठी गेलो, त्यांना परत निवडून आणलं, संधी दिली, पण त्यांचे उद्योग सुरूच होते, त्याचा परिणाम पक्षावर झाला, असा घणाघात शरद पवार यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की जेव्हा आमच्या सहकाऱ्यांनी पक्ष फोडला तेव्हा भुजबळ सकाळी माझ्या भेटीसाठी आले, मला म्हटले की खूप वाईट झालं. मी त्यांची समजून काढण्यासाठी जाऊ का? तेव्हा भुजबळ जे गेले ते परत आलेच नाहीत, दुसऱ्या दिवशी थेट मंत्रिपदाची शपथ घेतली असं शरद पवार यांनी म्हटलं.