निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला वेग आला आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार यांची सभा पार पडली या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांंवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चारशे पारचा नारा दिला होता, पण महाराष्ट्रात त्यांच्या 16 जागा आल्या, आमचे 31 खासदार निवडून आले. संविधानात बदल करण्याचा त्यांचा डाव जनतेनं ओळखला आहे. काहीही झालं तरी यांच्या हातात असलेली महाराष्ट्रातील सत्ता काढून घ्यायची आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत चारशे पारचा नारा दिला होता, चारशे जागा निवडून द्या म्हणाले पण महाराष्ट्रात त्यांच्या 16 जागा आल्या, आमचे 31 खासदार निवडून आले. संविधानात बदल करण्याचा त्यांचा डाव आता जनतेनं ओळखला आहे, असा घणाघात शरद पवार यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काहीही झालं तरी पुन्हा यांच्या हातात सत्ता जावू द्यायची नाही. गेल्या नऊ महिन्यांत 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकरी का आत्महत्या करीत आहेत. केलेला खर्च निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करतो असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी एक किस्सा देखील सांगितला, माझ्याकडे शेती खात्याचं काम होत, त्यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मला कळली, मी तेव्हा मनमोहन सिंग यांना सांगितले होते आणि सांत्वन करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कुटुंबाला भेटलो, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी रडत होती. म्हणाली कर्ज घेतलं, पीक लावलं, खर्च केला पण पीक उद्ध्ववस्त झालं. पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या वर्षी तीच परिस्थिती झाली. कर्ज फेडता येत नाही म्हणून शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तीच परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. या सरकार कडून सत्ता काढून घेतली पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.