विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या राज्यात केवळ 50 जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीने राज्यात तब्बल 231 जागा जिंकल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आकडेवारी सादर करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही.
प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मतं किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात ८० लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे ५७ लोक निवडून आले. म्हणजे ८० लाख वाल्यांचे १५ आणि ७९ लाख वाल्यांचे ५७. शरद पवार गटाचे ७२ लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले १०. अजित पवार गटाचे ५८ लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले ४१. ७२ लाखांचे १० आणि ५८ लाखवाल्यांचे ४१. हे काही तरी आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, आज मी विधानसभेतून थोडी माहिती घेतली, त्यंचां म्हणंण एकच होतं की लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आताच कशी करता? पण आमचं निरीक्षण असं आहे की, चार निवडणुका झाला. हरियाणात झाली. मी स्वत: तीथे गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था कठिण होती. पण भाजप सत्तेवर आली. पण त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला आले. महाराष्ट्रात भाजपला यश आलं. त्याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ छोटी राज्य तीथे आम्ही आणि जिथे मोठी राज्य तिथे भाजप असं दिसतं, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.