मुंबई | शिंदे समर्थक शिवसेना (Shivsena) नेत्या शीतल म्हात्रे (Shital Mhatre) आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्या व्हिडिओ प्रकरण अधिकच चिघळल्याचं दिसून येत आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज प्रकाश सुर्वे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या संजना घाडी यांनी केली आहे. संजय राऊत यांनीदेखील आज या व्हिडिओवरून आज अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. शीतल म्हात्रे यांचे ठाकरे गटावर आरोप होत आहेत, पण प्रकाश सुर्वे या प्रकरणी गप्प का आहेत, असा सवाल राऊत यांनी केला. त्यानंतर आमदार प्रकाश सुर्वे यांनीदेखील आज प्रथमच माध्यमांसमोर पत्राद्वारे भूमिका मांडली. शीतल म्हात्रे या बहिणीसमान असून या प्रकरणामुळे खूप मनःस्ताप होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओचं हे प्रकरण आता नव्या वळणावर येऊन ठेपलंय.
ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी म्हणाल्या की, दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज साईनाथ दुर्गे यांची सुटका होईल, असे आम्हाला वाटले होते. मात्र तसे काहीही झाले नाही. चौकशीच्या नावाखाली 17 मार्चपर्यंत पीसी दिली आहे. याचा अर्थ त्यांना हे प्रकरण 19 तारखेपर्यंत खेचायचे आहे. तोपर्यंत एसआयटी स्थापन केली जाईल आणि ती एसआयटीकडे पाठवली जाईल, अशी शक्यता आहे. शीतल म्हात्रे यांचा तो व्हिडिओ एडिट केलाय की नाही, यावरच अद्याप निर्णय झालेला नाही. तरीही तो एडिट केलाय अशा आरोपांखाली ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय.
पोलिसही मंत्रालयाच्या दबावाखाली काम करत असून हा कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर आहे. राज प्रकाश सुर्वे यांच्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ लाईव्ह करण्यात आला होता, नंतर राज प्रकाश सुर्वे यांनी हा व्हिडिओ त्यांच्या अकाऊंटवरून डिलीट केला होता. पुरावे नष्ट केल्याप्रकरणी राज प्रकाश सुर्वे यांची चौकशी व्हायला नको का? राज प्रकाश सुर्वे यांनाही आरोपी बनवण्याची आमची मागणी आहे.