कल्याण : 16 ऑगस्ट 2023 । राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या युतीचे सरकार सत्तेत आहे. राज्याच्या कारभार युती सरकार सांभाळत आहेत. तर, दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावरून त्यांच्यात कुरबुरी सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. कल्याण चक्की नाका टेकडी परिसरात भाजपा कार्यकर्त्यांकडून भिंतीवर भाजप पक्ष चिन्हाचे चित्र रंगवण्याचे काम सुरू होते. या दरम्यान शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांचे समर्थक तेथे आले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना भिंतीवर चिन्हाचे चित्र रंगवण्यास विरोध केला. यादरम्यान त्यांच्या बाचाबाची झाली. यात नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या समर्थकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरात भाजपचे काही कार्यकर्ते भिंतीवर चिन्ह रंगवत होते. त्याचवेळी शिंदे गटाचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या काही समर्थकांनी त्यांना विरोध केला. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नाही याचा राग येऊन नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना मारहाण केली.
भाजप कार्यकर्त्यांना मारहाणीनंतर भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी भाजप कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार आहे. भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांच्या सांगण्यावरूनच ही मारहाण झाल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांनी केला.
कल्याण शहराध्यक्ष संजय मोरे यांनी ‘तुमच्या नगरसेवकांना आवरा अन्यथा आम्ही हात सोडू’ असा इशाराही शिवसेना शिंदे गटाला दिला आहे. संजय मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जमा झाले होते.
एकीकडे शिवसेना आमदार यांनी आगामी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यावर शिंदे गटाकडून अदयाप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तर, दुसरीकडे भाजपच्या त्या चिन्हावरून शिंदे गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत. या घटनेची शहरात एकच चर्चा होत आहे.