मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : शिवसेनेचा ( शिंदे गट ) दसरा मेळावा आझाद मैदान येथे होत आहे. या मेळाव्यासाठी राज्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, यवतमाळ, हिंगोली, अमरावती, बुलढाणा यासह कोकणातुनही अनेक कार्यकर्ते आझाद मैदानात येण्यासाठी निघाले आहेत. उद्या शिवसेनेचा होणारा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होईल. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात भाषण करतील. सर्व शिवसेना कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतील. लोकसभेसाठी हा मेळावा महत्त्वाचा आहे, असे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा याचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यातून मांडतील. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवण्याचे त्याचे स्वप्न होते ते आम्ही निश्चित पूर्ण करू. पण, त्याआधी आम्हाला लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. एनडीचे घटकपक्ष म्हणून मुख्यमंत्री उद्या निश्चित आपली भूमिका जाहीर करतील. कुणाच्या टीकेकडे लक्ष देण्याऐवजी आम्ही लोकसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रित केल आहे असे ते म्हणाले.
लोकसभा जागांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे वक्तव्य केले ते योग्य आहे. कारण प्रत्येक नेता आपला पक्ष वाढविण्याचा विचार करतो. मागच्या लोकसभेला आम्ही 22 जागांवर निवडणुक लढवली होती. त्यामुळे आम्ही 22 जागेवर तयारी केली आहे. त्यावेळी भाजपनेही ४८ जागा लढविण्याची तयारी केली होती. आता परिस्थिती बदलली आहे. फॉर्म्युला बदलला आहे. अशावेळी तिन्ही पक्षांनी आपापली तयारी करावी. याचा सहकारी पक्षाला फायदा होऊ शकतो. मात्र, कुणाला किती जागा याचा अजूनही निर्णय झालेला नाही असेही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाबद्दल नेते रामदास कदम यांनी जे काही वक्तव्य केले असेल तर त्याकडे लक्ष देऊ नये. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला शब्द दिला आहे. न्यायप्रक्रियेसाठी सरकार सर्वतोपरी काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत. त्यामुळे इतर वक्तव्यांकडे लक्ष न देता कुठेही गैरसमज पसरू नये अशी शिंदे साहेब यांची भूमिका आहे. त्यामुळे रामदास कदम यांच्या वक्तव्याकडे लक्ष देऊ नये. आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत. ते मुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर मराठा समाजाने विश्वास ठेवावा. त्यांचेच वक्तव्य ग्राह्य धरावे. मुख्यमंत्री निश्चित स्वरूपाय मराठा समाजाला न्याय देतील असेही राहुल शेवाळे म्हणाले.