मुंबई: शिवसेनेच्या गोव्यातील पराभवावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीका केली आहे. महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार. चंद्रकांतदादा, तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे. सेना म्हणजे भाजपची सेना. दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल, असं सांगतानाच त्यांनी भाजपला हरवणार अशी गर्जना त्यांनी केली होती. त्यांची लढाई आमच्याशी नाही, नोटाशी होती हे मी सांगत होतो. राष्ट्रवादी आणि सेनेची मते एकत्र केली तरी नोटांची मते जास्त आहेत, अशी सडकून टीका देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. तसेच चार राज्यातील निवडणुकांमुळे हुरळून जाऊ नका. डोक्यात विजय जाऊ देऊ नका. आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा. आज रात्रीपासूनच कामाला लागा, असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. तसेच आम्हाला कोणत्याही पक्षाला मुंबईपासून मुक्त करायचं नाही, मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपने आज गोव्यातील विजयाचं जल्लोषात सेलिब्रेशन केलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी संबोधित करताना फडणवीसांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन शिवसेनेने गर्जना केली होती. सावंतंना हरवणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या. सेनेचे सर्व नेते तिथे गेले. प्रचार केला. पण शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त 97 मते मिळाली. हा कौल भाजपचा आहे. मोदींचा आहे. विश्वासाचा आहे. सामान्य जनतेचा आहे. मी केवळ प्रतिनिधी म्हणून गेलो. विजय तर मोदी मिळवून देणार होते, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
एक गोष्ट निश्चित सांगतो, आमच्या विजयाने सर्वांनाच आनंद झाला असं नाही. काही लोकांना इतकी मळमळ आहे की अपरिचित देवदूतांपेक्षा परिचित दैत्य बरा, असं त्यांचं झालं आहे. खरी तर इतकी मळमळ बरी नाही. तुम्ही कितीही मळमळ केली तरी मोदीच निवडून येणार. कुणालाही मळमळ कळकळ झाली तरी या देशातील गरीब आणि महिलांचा आशीर्वाद मोदींच्या मागे आहे. तरीही आम्ही जिंकणार आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
चार राज्यातील निवडणुकानंतर संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली. मोदी है तो मुमकीन है पाहायला मिळालं. मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण केला. मोदी आपल्यासाठी कधीही आहे. मोदी मरू देणार नाहीत, उपाशी राहू देणार नाहीत, बेरोजगार राहू देणार नाहीत, हा लोकांना वाटणारा विश्वास मतांमध्ये परिवर्तीत झाला, असं फडणवीस यांनी सांगितलं. गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना आधीच सरकार स्थापनेसाठीचं पत्रं दिलं होतं. पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरूही राजभवनावर गेलं नाही. इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
संबंधित बातम्या:
अभी तो असली लढाई मुंबई में होगी, देवेंद्र फडणवीस यांनी फुंकलं महापालिका निवडणुकीचं रणशिंग