नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेच्या शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटासाठी (Thackeray Group) आपलं लेखी म्हणणं मांडण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार ठाकरे गटाकडून ईमेलच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं मांडण्यात आलं. दुसरीकडे शिंदे गटाकडून मुदत संपत आली तरी लेखी म्हणणं मांडण्यात आलं नव्हतं. अखेर शेवटच्या मिनिटाला शिंदे गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल झाले. ते धावत-धावत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांनी शिंदे गटाचं लेखी म्हणणं मांडलं. यावेळी प्रसारमाध्यमांनी वकिलांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या लेखी उत्तरात धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं, अशी विनंती केली आहे.
“मूळ पक्ष आम्हीच आहोत. त्यामुळे आम्हाला पक्षाचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच मुख्य नेतेपद घटनात्मक आहे. पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या आमच्याकडे जास्त आहे. बहुमत आमच्याकडे आहे”, अशी भूमिका शिंदे गटाकडून लेखी उत्तरात मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चिन्ह देताना लोकप्रतिनिधी संख्याबळ विचारात घेतलं जावं. निवडणूक आयोगानं सांगितल्याप्रमाणे आम्ही पुराव्यांची पुर्तता केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं, असं म्हणणं शिंगे गटाने लेखी उत्तरात मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय.
शिंदे गटाआधी ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात लेखी म्हणणं मांडलंय. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाविषयी सविस्तर भूमिका मांडण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्याला न्याय द्यावा, अशी विनंती या लेखी उत्तरात करण्यात आलीय.
ठाकरे गटाने आपल्या लेखी उत्तरात शिवसेना पक्षातील बंडखोरी तारखेसह मांडली आहे. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी नेमकी कशी बंडखोरी केली याबाबत सविस्तर मत मांडण्यात आलंय.
ठाकरे गटाने आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये जे मुद्दे मांडले होते तेच मुद्दे लेखी उत्तरातही मांडण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारं मुख्य नेतेपद हे घटनात्मक नाही, असा मुद्दा ठाकरे गटाने आपल्या लेखी उत्तरात मांडला आहे.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेची घटना यापूर्वी मान्य होती. पण आताच नेमकं काय झालं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
एकनाथ शिंदे यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह किंवा पक्ष आमचाच आहे, असा दावा करण्याचा अधिकार त्यांना नाही. कारण त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून रद्द करण्यात आलं होतं, असं म्हणणं ठाकरे गटाने लेखी उत्तर मांडलं आहे.