उस्मानाबाद – उद्धव ठाकरेंची साथ (Uddhav Thackeray)आणि शिवसेना सोडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)गटाकडून आजही वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. असा गौप्यस्फोट उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील (Kailas Patil)यांनी केला आहे. शिंदे गटाकडून कधी आमिषे, ऑफर देण्यात येत आहेत. तर कधी दबाव टाकून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत, असे आमदार कैलास पाटील म्हणालेत. मात्र कितीही ऑफर आल्या, दबाव आला तरी शिवसेना सोडणार नसल्याचा खुलासाही आमदार कैलास पाटील यांनी केला. आजही काही सहकारी आमदारांच्यामार्फत निरोप येतात, सगळेच निरोप जाहीर सांगायचे नसतात. असे सांगत त्यांनी काय ऑफर व निरोप दिला जातोय हे गुलदस्त्यात ठेवले आहे.
तुळजापुर येथे युवा सेनेच्या मेळाव्यात बोलताना आमदार कैलास पाटील यांनी हा खळबळजनक गौप्यस्फोट केला यावेळी युवासेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई, खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर गुवाहाटीला जाताना कैलास पाटील हे रस्त्यातूनच परत आले होते. आपल्याला फसवून नेल्याचा सांगत कैलास पाटील तात्काळ मातोश्रीवर दाखल झाले होते. त्यानंतर या सुटकेची व घटनेची मोठी चर्चा झाली होती. शिवसेनेतील निष्ठावान आजही शिवसेनेच्याच बाजूने असल्याचे सांगताना उध्दव ठाकरे हे नेहमी कैलास पाटील यांचे उदाहरण देतात. त्याच कैलास पाटील यांनी आपल्याला आणखीही ऑफर येत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
शिवसेनेने आम्हाला ओळख दिली, उमेदवारीचे तिकीट दिले. त्यामुळे आम्ही खुर्चीवर बसू शकलो. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांच्या मतांवर आम्ही आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी झालो आहोत. शिवसेनेने आम्हाला ओळख निर्माण करुन दिली आणि ज्यांनी ओळख दिली त्यांच्याशी कधीही प्रतारणा करायची नाही. असेही पाटील यावेळी म्हणाले. कितीही अमिषे आली तरी आपण आणि खासदार ओमराजे हे शिवसेना सोडणार नाहीत. काही नेते जरी सोडून गेले तरी, सामान्य जनता शिवसेनेच्या व उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे व राहणार असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.