विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला जोर आला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची सभा पार पडली या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर घणाघात केला आहे. आता परिवर्तनाची वेळ आली आहे, ज्या चीपी विमानतळाचे उद्घाटन उद्धव साहेबांनी केलं होतं, ते विमानतळ या सरकारने बंद पाडलं. एक राजकीय यादी आम्ही बनवत आहोत. जे राजकीय गुंड आहेत, ज्यांनी लोकांना त्रास दिला आहे त्यांना आम्ही बर्फाच्या लादीवर झोपवणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जिथे जातो तिथे सांगत आहेत, की आपलं मविआच सरकार येणार आहे म्हणून, आंब्यासाठी जागतिक पातळीवर फूड प्रोसेसिंग करता येईल काय याबाबत आम्ही पाहात आहोत. संदेशजी तुम्हाला २३ तारखेपासून आमदार म्हणून कामाला लागायचं आहे. या पुढच्या ४८ तासात तुम्हाला घाबरवलं जाईल, अडवलं जाईल, पळवून नेल जाईल.पण घाबरायचं नाही. सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी नागरिकांना त्रास दिला आहे त्यांना सोडणार नाही, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
‘अदानींना मुंबई विकायला चालले आहेत. कदचित उद्या ते अदानींना इकडे घेऊन येतील. यांचे खरे मालक, खरे मुख्यमंत्री अदानी हे आहेत. मुंबई केंद्रशासित करण्याचा हे प्रयत्न करत आहेत. पण त्यांना माहितीये आम्ही रस्त्यावर उतरू, गेल्या दोन महिन्यात एक फसवी योजना आणली आहे. लाडकी बहीण योजना. २०२४ ला १५०० देतायेत त्यांची घोषणा होती १५ लाखांची. झाशीत एवढी दुर्घटना घडली तरी त्यांनी आपला एक ही कार्यक्रम रद्द केला नाही. महिला देशाच्या आधारस्तंभ आहेत, त्यांना बळकट करणारा कायदा आपण आणणारं आहोत. त्यांच्यासाठी पोलिस स्टेशन आम्ही आणणार आहोत. माझ्या वडिलांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.