मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का

| Updated on: Mar 02, 2025 | 4:38 PM

मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत असून आता आणखी एक नेत्यानं उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, महायुतीमधील तीन पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मिळून राज्यात तब्बल 232 जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत, याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून आज संघटनात्मक मजबुतीसाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, मात्र त्याचपूर्वी भाजपकडून उद्धव ठाकरे यांना हा धक्का देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात असे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता, अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर पुण्यात देखील भाजपनं ठाकरे गटाला धक्का दिला, तेथील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे.  माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.