खेड | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पुणे पोटनिवडणुकीच्या ऑनलाईन प्रचारावरुन टीका केली होती. सत्ता गेल्यानंतर वाटलं होतं की लाईनीवर येतील, पण हे अजूनही ऑनलाईनच आहेत, असं शिंदे म्हणाले होते. शिंदेंच्या या टीकेला उबाठा गटाच्या डॅशिंग उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. तसेच तुमच्या 40 आमदारांचं डिपॉझिट वाचवायची तयारी ठेवा, असं आव्हान ही यावेळेस अंधारे यांनी शिंदे यांना दिलं. सुषमा अंधारे या उबाठा गटाच्या खेडमधील जाहीर सभेत बोलत होत्या.
” एकनाथ भाऊ कसब्याच्या पोटनिवडणुकीत पक्षप्रमुखांनी ऑनलाईन 2 मिनिटांचा संदेश दिला होता. तरीही विजय झाला आहे. आता ते विभागवार सभा घेणार आहेत. तेव्हा तुमच्या 40 जणांची डिपॉझिट कशी वाचवायची, याची तयारी तुम्ही ठेवा”, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकवरुन उत्तर दिलं.
पुणे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल केला होता. शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख, जुने नेते असा केला. तसंच गुरुवारच्या ऑनलाईन भाषणावरुन निशाणाही साधला. सत्ता गेल्यावर लाईनवर येतील असं वाटलं होतं. पण ऑनलाईनच आहेत, अशी बोचरी टीका शिंदेंनी केली होती.
दरम्यान या सभेला माजी खासदार आणि नेते अनंत गीते, आमदार भास्कर जाधव, सचिव खासदार विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, खासदार अरविंद सावंत, उपनेते आमदार राजन साळवी, माजी पालकमंत्री रवींद्र वायकर, अॅड. अनिल परब, जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि विलास चाळके उपस्थित होते.