मोठी बातमी! शिवसेनेचं संभाव्य खातेवाटप समोर, एकनाथ शिंदेंकडे या दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी!

| Updated on: Dec 21, 2024 | 6:47 PM

शिवसेना मंत्र्यांच्या संभाव्य खातेवाटपाची यादी समोर आली आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! शिवसेनेचं संभाव्य खातेवाटप समोर, एकनाथ शिंदेंकडे या दोन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी!
Follow us on

राज्यात महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर अजित पवार  आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर अनेक दिवस मंत्रिमंडाळाचा विस्तार रखडला होता. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. अखेर नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपच्या सर्वाधिक म्हणजे 19 तर शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान जरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी मंत्र्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आलेलं नाही. खाते वाटप कधी होणार याकडे मंत्र्यांसोबतच सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी खाते वाटप होण्याची शक्यता आहे.

दरम्यान त्यापूर्वी शिवसेनेच्या संभाव्य खाते वाटपाची यादी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास तसेच गृहनिर्माण खांत मिळण्याची शक्यता आहे. प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्रालय, भरत गोगावले यांना रोजगार हमी मंत्रालय, प्रकाश आबिटकर यांना पाणीपुरवठा, उदय सामंत यांना उद्योग किंवा आरोग्य मंत्रालय तर  शंभूराज देसाई यांना उत्पादन शुल्क किंवा महसूल खातं मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब 

अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. मात्र मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं. अधिवेशन काळात मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र आज अधिवेशन संपलं तरी अजूनही मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आलेलं नाहीये. दरम्यान आज किंवा उद्या मंत्र्यांना खाते वाटप केलं जाऊ शकतं अशी माहिती आता समोर येत आहे. काही खात्यावर अजूही तीन पक्षात एकमत नसल्यानं खाते वाटपाला विलंब होत असल्याची देखील चर्चा सुरू आहे.