मुंबई : इ. स. 1688 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. याच काळात इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसरा याला पैशाची अत्यंत गरज होती. त्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून 50 हजार पौंड इतके कर्ज घेतले होते. त्यासाठी त्याने सहा टक्के व्याज देण्याचीही तयारी दाखविली होती. मात्र पुढे त्याला हे कर्ज फेडणे अशक्य झाले होते. त्यामुळे राजा चार्ल्स याने ईस्ट इंडिया कंपनीला 10 पौंड इतक्या नाममात्र भाड्यावर मुंबई बेट सर्व हक्कांनिशी दिले. मुंबई ताब्यात आल्यावर पुढे ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास आणि कलकत्ता ही बंदरे घेतली. मद्रास घेण्यासाठी कंपनीने राजा चंद्रगिरी यांना 1200 होन दिले. तर, बंगालच्या नबाबाला वार्षिक भाडे 1200 रुपये देऊन कलकत्ता घेतले. मात्र, मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या तीन बंदरापैकी मुंबई हे कंपनीसाठी सर्वात भरभराटीचे बंदर ठरले.
ईस्ट इंडिया कंपनीचा जॉर्ज ऑक्सिडेन हा गव्हर्नर होता. त्यानेच मुंबईला पहिली भेट दिली. त्यावेळी सुरत येथून इंग्रज गव्हर्नर सर्व कारभार पाहत असे. संपूर्ण पश्चिम भारताचे ते मुख्य केंद्र होते. मात्र, गव्हर्नर जॉर्ज ऑक्सिडेन याने मुंबईची परिस्थिती पाहिली. उत्तरेकडील कोणत्याही व्यक्तीपेक्षा मुंबईतला व्यक्ती दुःखी, गरीब आणि गरजू होता. गरजेपुरते तांदूळ, नारळ, थोडे मासे याच्याव्यतिरिक्त अन्य गरजेच्या वस्तूंसाठी दुसऱ्या प्रदेशावर अवलंबून राहावे लागत असल्याचेही त्याला दिसून आले. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाऱ्यांच्या दृष्टीने मुंबई हे एक मुख्य केंद्र बनविण्याचा उद्देश मनात ठेवला. त्यादृष्टीने उपाययोजना सुरू झाल्या. मुंबईच्या विकासाचा पहिला आराखडाही जॉर्ज ऑक्सिडेन तयार केला. यामागचे महत्वाचे कारण म्हणजे मुंबईची उपयुक्तता…
बारा मैल लांब आणि चाळीस फूट खोल असे मुंबई बंदर पसरले होते. तसेच, ते अत्यंत सुरक्षित आणि मोक्याच्या जागी वसले होते. जहाजबांधणी आणि जलवाहतूक हा त्यावेळचा प्रमुख उद्योग होता. त्यात मोठे बदल घडून येत होते. तापी नदीजवळ असणारे सुरत आणि खाडीलगत असलेले वसई ही बंदरे मोठी होती. परंतु, पश्चिम किनारपट्टीवरील या बंदरांचा वापर कमी होत चालला होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यापारी जहाजांना मुसळधार पावसात आसरा घेण्यासाठी महत्वाचे असे बंदर उपलब्ध नव्हते. जॉर्ज ऑक्सिडेन याने नेमकी हीच बाब हेरून मुंबई बंदराच्या उभारणीस सुरवात केली. ईस्ट इंडिया कंपनीचा जो काही व्यापारी वर्ग होता त्याला फक्त पैशांमध्ये रस होता. त्यामुळे मुंबईसारखे मोक्याचे बेट लवकरात लवकर कसे व्यापारी केंद्र बनेल याकडे त्यांनी जास्त लक्ष दिले. मुंबई हे व्यापाराचे प्रमुख केंद्र व्हावे यासाठी इंग्रजांनी देशातील काही व्यापाऱ्यांना मुंबईत आणले होते.
सुरतमध्ये भीमजी पारेख हा नामांकित व्यापारी होता. सुरतेवर मुघलांची सत्ता होती. भीमजी याच्यावर धर्मांतर करण्याची सक्ती करण्यात येत होती. पण तो जुमानत नव्हता म्हणून त्याचा छळ सुरु होता. इंग्रजांनी भीमजी याला मुंबईत आणले. त्याला घरासाठी जागा दिली. कल्याण आणि भिवंडी येथे नोन्ना पारशी हा एक दलाल होता. त्याची नेमणूक इंग्रजांनी हातमागाचे कापड पुरविण्यासाठी केली. तर, नवसारीहून दोन पारशी व्यापाऱ्यांना इंग्रजांनी मुंबईमध्ये बोलावले. या दोन व्यापाऱ्यांनी मुंबईत सूतगिरणी चालू केली होती.
मुंबईचा ताबा घेताना ईस्ट इंडिया कंपनीने मोठा सभारंभ साजरा केला. त्या समारंभाला मुंबईतील सर्व धर्मांची लोक, व्यापारी, प्रतिष्ठित मंडळी आवर्जून उपस्थित होती. पोर्तुगीज, हिंदू आणि इतर धर्मीय लोकांची भाषणे केली. सभारंभानंतर सैन्याचे संचलन झाले. परंतु, इतकी वर्ष मुंबईवर सत्ता असलेल्या पोर्तुगीज यांच्या मनात भलतीच धास्ती होती. आपली वैयक्तिक मालमत्ता हिसकावून घेतली जाईल अशी भीती त्यांना वाटत होती. याचे कारण म्हणजे इंग्रजांनी सरकारी कारभारात आणलेली शिस्त. मुंबईतील जमीन विकण्यासाठी इंग्रजांनी काही नियम घातले होते. विकाऊ जमिनीची सलग तीन दिवस जाहिरात करणे, जमीन-विक्रीचा करारनामा सरकारदफ्तरी दाखल करण्याचे बंधन घालण्यात आले होते. इंग्रजांनी ज्याप्रमाणे नियम घातले त्याचप्रमाणे त्यांनी सहानुभूतीपोटीही काही निर्णय घेतले होते.
मुंबईत जोराचा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतपिकाचे उत्पादन निघाले नाही. इंग्रज शेतकऱ्यांकडून तांदुळाच्या रूपाने शेतसारा जमा करत. पण, पावसामुळे शेतपिकच निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी इंग्रज शासकांकडे शेतसारा भरता न येण्याची कैफियत मांडली. इंग्रजांनी शेतकऱ्यांच्या या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार केला. दुसरीकडे इंग्रजांनी कोळ्यांच्या मासेमारीवर कर लावला होता. कोळ्यांनीही त्याबद्दल तक्रार केली असता इंग्रजांनी त्यांनाही करातून सूट दिली होती.
इंग्लंडचा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालच्या जॉन चतुर्थ यांची कन्या कॅथरीन डी ब्रागांझा यांच्या विवाहाचा करार झाला होता. या करारानुसार मुंबईची सात बेटे, टँगियर्स बंदर इंग्रजांना द्यायचे होते. त्याप्रमाणे मुंबई चार्ल्स दुसरा याच्या ताब्यात आली. पण, कर्जामुळे त्याने ती ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली. कंपनीने मुंबईचा विकास करण्याचे लक्ष्य समोर ठेवले. पण, त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज हे मुंबई जवळील भागात सत्ता गाजवीत होते. तर, दुसरीकडे पश्चिम किनाऱ्यालगतच्या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यासाठी शिवाजी महाराज, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्यात चढाओढ सुरु होती. त्यामुळे इंग्रजांनासुद्धा त्यामध्ये नाईलाजाने उतरावे लागले. पोर्तुगीज इंग्रजांचे शेजारी. पण, त्यांनी इंग्रजांसोबत वैर बाळगले होते. इंग्रजांचा व्यापार उध्वस्त करण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्याउलट शिवाजी महाराज आणि जंजिऱ्याचा सिद्दी हे इंग्रजांशी मैत्री करू पाहत होते. मात्र, आपण फक्त व्यापारी आहोत असे सांगत ईस्ट इंडिया कंपनीने त्या वादातून स्वतःला बाजूला ठेवले.
शिवाजी महाराज यांनी सुरत शहर लुटून बादशहा औरंगजेब याची झोप उडविली होती. त्यावेळी जेराल्ड ऑगियर हा मुंबईचा गर्व्हनर होता. त्याने शिवाजी महाराज यांच्यासोबत सलोख्याचे संबंध ठेवण्याचे धोरण स्वीकारले. मुंबईला गरजेच्या वस्तूंचा पुरवठा मराठ्यांकडूनच जास्त प्रमाणात होत होता. त्यामुळे शिवाजी महाराज यांच्यासोबत व्यापारी करार करणे कंपनीला आवश्यक होते. परंतु, महाराज यांनी जवळपास सहा वर्षे कराराच्या बोलण्यांत झुलवत ठेवले.
इंग्रजांनी आपले वकील नारायण शेणवी यांना शिवाजी महाराज यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी पाठविले. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होता. राज्याभिषेकासाठी डेप्युटी गव्हर्नर हेन्री ऑक्सिडेन हा दोन इंग्लिश साथीदारांसह रायगडावर निघाला. त्याने आपल्यासोबत उंची अलंकार, काही दुर्मिळ वस्तू असा 3 हजार रुपयांचा नजराणा नेला होता. शिवाजी, संभाजी आणि शिवाजी महाराज यांच्या मंत्र्याना देण्यासाठी त्याने काही मौल्यवान हिरेही सोबत घेतले होते. सहा दिवसांचा प्रवास करून ते मुंबईहून रायगडला पोहोचले. परंतु, शिवाजी महाराज यांची भेट मिळण्यासाठी त्यांना आणखी एक आठवडा वाट पहावी लागली.
रायगडावर 6 जून 1674 या दिवशी शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. हेन्री ऑक्सिडेन आपले वकील नारायण शेणवी यांच्यासोबत राज्याभिषेकाच्या दिवशी सकाळी आठ वाजता महाराजांच्या दर्शनाला गेला. नारायण शेणवी यांने इंग्रजांची भेट म्हणून राजांना हिऱ्याची अंगठी दिली. शिवाजी महाराज यांनी त्यांचे स्वागत करून सिंहासनाजवळ बोलावून घेतले आणि वस्त्रे वगैरे देऊन त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. राज्याभिषेक सोहळ्याला हजर राहणारा हेन्री ऑक्सिडेन हा एकमेव युरोपीय अधिकारी होता.
जून महिन्यात रायगड परिसरात पावसाळा सुरु झाला होता. आधीच प्रवासामुळे ऑक्सिडेन, त्याचे सहकारी थकले होते. त्यातच करार होणे आवश्यक असल्याने ऑक्सिडेन याने रायगडावरच मुक्काम केला. रायगडावर राहून त्यांनी शिवाजी महाराज यांच्या भेटीचे प्रयत्न सुरु केले. अखेर, राज्याभिषेकानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 11 जूनला त्याच्या प्रयत्नांना यश आले. शिवाजी महाराज यांनी याच दिवशी इंग्रजांसोबत व्यापारी करार केला.
इंग्रज व्यापाराची उलाढाल करत असताना त्यांच्या हाती शिवाजी महाराज यांची एक सहा हजारांची हुंडी हाती लागली. ती हुंडी इंग्रजांकडे कशी आली याचा एक किस्सा आहे. गोवळकोंड्याच्या एका हिऱ्यांच्या व्यापाऱ्याचे शिवाजी महाराज यांच्याकडून पैसे येणे बाकी होते. त्याने या पैशांच्या बदल्यात हुंडी लिहून दिली होती. ही हुंडी हिऱ्याच्या व्यापाऱ्याने परस्पर एका धान्य व्यापाऱ्याला दिली आणि आपले पैसे सोडवून घेतले. तो धान्य व्यापारी इंग्रजांचे देणे लागत होता. त्याबदल्यात धान्य व्यापाऱ्याने शिवाजी महाराज यांची ती हुंडी इंग्रजांना दिली. त्यामुळे इंग्रजांना पैशाच्या वसुलीसाठी शिवाजी महाराज यांच्याकडे जावे लागले.
इंग्रजांनी आपला वकील नारायण शेणवी, गिरिधारीदास आणि एक इंग्रज अधिकारी यांना रायगडावर पाठविले. महाराजांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था रायगडावर केली. पण, हुंडीचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ करू लागले. त्या तिघांनी अनेक दिवस रायगडावर काढले अखेर कंटाळून ते रिकाम्या हाताने मुंबईला परत आले. इंग्रजांनी हा पेच सोडविण्यासाठी शिवाजी महाराज यांची मुंबईच्या जवळ ये-जा करणारी जहाजे जप्त करण्याची धमकी दिली. शिवाजी महाराज यांच्याकडे असलेले इंग्रजांचे येणे वसूल झाले. पण, त्यामुळे शिवाजी महाराज आणि इंग्रज यांच्यामधील संबंध बिघडले. त्यांच्यामधील पुढील व्यवहार बंद झाला तो कायमचाच.