हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात 19 जुलै रोजी दाखल होत आहेत. शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेली वाघनखं याची देही याची डोळा पाहण्यासाठी आता नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रूचा कोथळा बाहेर काढणाऱ्या शिवरायांचे अमोघ अस्र पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांपासून इतिहास प्रेमी सज्ज झालेले आहेत. शेकडो वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ही वाघनखे अखेर हा पराक्रमी भूमीत परतली आहेत. या वाघनखांना पाहण्यासाठी सातारा येथील राज्य वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. छत्रपतींची वाघनखं पाहाण्यासाठी मोठी गर्दी उसळणार असल्याने राज्य सरकारने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवरायांचा आठवावा प्रताप..महाबळेश्वर आणि जावळीच्या खोऱ्यात बसलेल्या किल्लेप्रताप गडाच्या पायथ्या इतिहास घडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची अफझल खानाशी प्रतापगडाच्या पायथ्याशी तात्पुरत्या तयार केलेल्या शामियान्यात भेट झाली होती. यावेळी शिवरायांची मान धिप्पाड राक्षसी अफझल खानाने बगलेत दाबून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतू चिलखताने महाराजांना वाचविले. त्यानंतर महाराजांनी वाघनखं घुसवून अफझल खानाचा कोतळा बाहेर काढला. त्यावेळचा इतिहास वाचताना आजही आपण थरारतो.अंगावर रोमांच उभा राहतो…
शिवरायांची ही ‘वाघनखं’शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून सातारा येथील राज्य वस्तू संग्रहालयात पोहचलेली आहेत.यासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी खासे प्रयत्न केले आहेत. या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या, 19 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. छत्रपतींची ही ‘वाघनखं’ पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या वाघनखांच्या प्रदर्शनाचा ‘मिनिट टू मिनिट’ कार्यक्रम कसा असेल ते पाहूयात…
– सातारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता मुख्य सोहळा सुरु होईल.
– कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘गडगर्जना’ या तासभर चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असेल
– मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवर हे दुपारी 12.30 वाजता राज्य वस्तू संग्रहालय येथे पोहोचतील.
– दुपारी12.35 वाजता वाघनखांसमोरील पडदा बाजुला सारून वाघनखांसह शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले जाईल.
– हे प्रदर्शन पाहिल्यानंतर सर्व मान्यवर दुपारी 1 वाजता पुन्हा वस्तुसंग्रहालयातून जिल्हा परिषद सभागृहात परततील.
– दुपारी 1 ते 2.15 वाजेपर्यंत सर्व मान्यवरांचे स्वागत-सत्कार समारंभ आणि मार्गदर्शन होईल
– या कार्यक्रमास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती घराण्याचे वंशज उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपतीछत्रपती आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असेल.
– याशिवाय लंडनहून वाघनखं घेऊन आलेल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयाचे आंतरराष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख निकोलास मर्चंड यांची कार्यक्रमात विशेष उपस्थिती असेल.