छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या गनिमी युद्धात कोथळा बाहेर काढला होता. ती वाघनखं अखेर येत्या 19 जुलैला भारतात आणली जाणार आहेत. या वाघनखांवरुन राज्यात खूपच चर्चा सुरु आहे. ही शिवरायांची वाघनखं शिवाजी महाराज यांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला होता. त्यानंतर स्वत:सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ही वाघनखं शिवरायांची असल्याचा दावा कोणीच केला नसल्याची कोलांटी उडी मारली होती. अखेर ही वाघनखं लंडनच्या म्युझियममधून येत्या 19 तारखेला महाराष्ट्राच्या भूमीवर येत असून भाजपाने आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा ‘इव्हेंट कॅश’ करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही.
लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून ‘वाघनखं’ तीन वर्षांसाठी भारतात येणार आहेत. 19 जुलैपासून सातारा येथील संग्रहालयात प्रदर्शनासाठी ती ठेवण्यात येणार आहेत असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पदभार सांभाळल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता आणि अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबवविले आहेत.रयतेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत असेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.
देव, देश आणि धर्मासाठी लढून ‘स्वराज्य’ हितासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज या नावातच ऊर्जा आहे, बळ आहे शक्ती आहे. याच शक्तीने बलाढ्य योद्धा असलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला.शिवरायांच्या महापराक्रमचा हा इतिहास रोमांच उभा करणार आहे आणि महाराष्ट्रातील पिढ्यान पिढ्या शौर्यवान आणि बलवान करणारा आहे. म्हणूनच ही ‘वाघनखं’ स्वराज्य भूमीत आणण्याचा संकल्प मी केला होता आणि तो पूर्ण होतोय याचे मला समाधान असून, रयतेचे राज्य ही महाराजांची संकल्पना साकार करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात हे शक्य झाले” अशी भावना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची “ती” ‘वाघनखं’ लंडनहून भारतात आणि स्वराज्यात अर्थात महाराष्ट्रात आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण केल्याने सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे राज्यातील शेकडो शिवप्रेमी संस्था लाखो शिवप्रेमींकडून स्वागत केले आहे.