सातारा: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजप आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले (Shivendra raje bhosale ) आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. (Shivendra raje bhosale and Shashikant Shinde sit together in wedding ceremony in Satara)
मात्र, आज साताऱ्यातील एका लग्नसमारंभात शिवेंद्रराजे भोसले आणि शशिकांत शिंदे एकत्र दिसून आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्यात कोणताच वाद नाही अशा आविर्भावात हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसले होते. या अनपेक्षित चित्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
“मग.. माझी वाट लागली तरी चालेल, याला संपवायचं ना.. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवणार, ही आमची भूमिका आहे. काट्याने काटा काढायचा, मी पण मग मागे फिरणारा नाही. मी पण कुणाला घाबरत नाही. शेवटी मी उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे.” असा इशारा शिवेंद्रराजेंनी दिला.
छत्रपतींचं घराणं आहे, आपली भांडणं, मारामाऱ्या… नाव खराब व्हायला नको. मग आम्हीपण एकत्र आलो. आम्ही एकत्र आलेलो काही जणांना बघवत नाही, माझ्या कानात काहीतरी सांग, त्यांच्या कानात काहीतरी सांग, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी लगावला.
शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. (Shivendraraje Bhosle slams Shashikant Shinde referring Udayanraje)
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.
शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. दोन वेळा जावळी, तर दोन वेळा कोरेगाव मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत.
संबंधित बातम्या:
साताऱ्यात दोन ‘राजें’चं मनोमीलन, भाजपप्रवेशानंतर उदयनराजेंची शिवेंद्रराजेंशी चर्चा
उदयनराजे थोरले बंधू, विधानसभेला मला मदत करणार : शिवेंद्रराजे
(Shivendra raje bhosale and Shashikant Shinde sit together in wedding ceremony in Satara)