रायगड: किल्ले रायगडावर होऊ घातलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी शिवजयंतीच्या दिवशी रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवरुन वाद उद्भवला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. मात्र, या डिस्को पद्धतीच्या रोषणाईवर संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे शिवराज्याभिषेक दिनाच्या (shivrajyabhishek sohala 2021) पूर्वसंध्येला रायगडावर पारंपरिक रोषणाई करण्यात आली आहे. (shivrajyabhishek sohala 2021 preparation Raigad Fort)
दरम्यान, आज संभाजीराजे छत्रपती किल्ले रायगडावरुन मराठा आरक्षणासंदर्भात एखादी महत्वपूर्ण घोषणा करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संभाजीराजे यांनी राज्य सरकारपुढे पाच प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या मागण्या 5 जूनपर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, असेही संभाजीराजे यांनी बजावले होते. मात्र, राज्य सरकारने अद्याप सर्व मागण्या मार्गी लावलेल्या नाहीत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती काय भूमिका घेणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईवरुन खासदार छत्रपती संभाजीराजे (MP sambhaji raje) यांनी टीका केल्यानंतर वादंग निर्माण झाला होता. ही रोषणाई शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फंडातून करण्यात आली होती. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे नाराज झाले होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या पुर्वसंधेला दुर्गराज रायगड ऐतिहासिक वास्तूंना साजेश्या पध्दतीने आकर्षक विद्यूतरोषणाई करण्यात आली.#६जून#शिवराज्याभिषेक_सोहळा pic.twitter.com/Lqt0qRb620
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 5, 2021
त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही संभाजीराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. दृष्टीकोन पॉझिटिव्ह ठेवला, तर सगळं पॉझिटिव्ह दिसतं, दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळं निगेटिव्ह दिसेल, असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला होता.
यानंतर संभाजीराजे यांनी आपली बाजू स्पष्ट केली होती. रायगड किल्ल्यावरील विद्युत रोषणाईसंदर्भात मी टीका केल्यानंतर अनेक शिवभक्तांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, मी तेव्हा पुरातत्व खात्याला फटकारले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांना धारेवर धरण्याचा प्रश्नच येत नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले होते.
संबंधित बातम्या:
माझा राग श्रीकांत शिंदेवर नव्हे तर पुरातत्त्व विभागावर; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती
राज्याभिषेक सोहळ्यासाठी मिळेल त्या वाहनाने रायगडाकडे कूच करा; संभाजीराजे छत्रपतींचा आदेश
(shivrajyabhishek sohala 2021 preparation Raigad Fort)