महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीने 230 जागा जिंकल्या. 132 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचं लक्ष आहे. शपथविधी कधी होणार? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात आहे. तसंच मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी भाजपचा आग्रह असल्याचं बोललं जात आहे. अशात एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावं, यासाठी आग्रही आहेत. त्याचमुळे नव्या सरकारच्या शपथविधीला उशीर होत असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. यासाठी ठिकठिकाणी नवस बोलले जात आहेत. कोल्हापूरच्या जोतिबालादेखील साकडं घालण्यात आलं आहे. शिवसैनिकांनी इचलकरंजी ते जोतिबा डोंगर इथपर्यंत चालत जाऊन एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी युवकांनी साकड घातलं आहे.
कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली ज्योतिबाला अभिषेक करण्यात आला. हनुमान मंदिर कबनूरपासून सकाळी नऊ वाजता ते 60 – 70 किलोमीटर पायी प्रवासाला सुरुवात केली. संध्याकाळी साडेसात वाजता ज्योतिबा मंदिरत ते पोहचले. त्यानंतर जोतिबाचं दर्शन घेतलं. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी देवाला अभिषेक करण्यात आला. तसंच साकडं घालण्यात आलं.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. आदिशक्ती मुक्ताईकडे वारकरी संप्रदायाने साकडं घातलं आहे. आरती आणि अभिषेक करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायासाठी अनेक निर्णय हितार्थ घेतले, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. तसंच चार वेळा आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताईनगरला येऊन घेतलं. यासाठी आज वारकरी संप्रदाय प्रमुख संप्रदाय मंडळांनी मुक्ताईनगर मध्ये एकत्रित आदिशक्ती मुक्ताई चरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावा यासाठी महाआरती करत अभिषेक करण्यात आला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूका लढल्यानंतर मिळालेल्या यशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे. तर भाजपला 132 जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा, अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे समोपचारानं दोनही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न आहे. वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे.