विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जांगासाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप तीन, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्येकी एक जागा दिली जाणार आहे. यानुसार, काल भाजपकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले. यात संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांचा समावेश आहे. यानंतर आता विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून एक नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवलं जाणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वाट्याला विधानपरिषदेची एक जागा आली आहे. यासाठी अनेकजण इच्छुक होते. मात्र यात धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर होते. त्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर आता चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला, असे बोललं जात आहे.
विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे.
कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी?
भाजपा
1) संजय किणीकर- संभाजीनगर
2) दादाराव केचे- वर्धा
3) संदीप जोशी – नागपूर
शिवसेना
1) चंद्रकांत रघुवंशी- नंदुरबार
राष्ट्रवादी कांग्रेस (अजून जाहीर नाही)
संभाव्य
1) उमेश पाटील
2) झिशान सिद्दीकी