विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर गेल्या आठवड्यात महायुतीच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये अनेक जुन्याजाणत्या नेत्यांसह अनेक नवीन, तरूण चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मात्र मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं, त्यांच्या नावाचा समावेशच झाला नाही. यामुळे अस्वस्थ असलेल्या छगन भुजबळ यानी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी बोलून दाखवली होती. जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना असं म्हणत त्यांनी आपण वेगळे मार्ग शोधण्यास तयार असल्याचंही दर्शवलं. तर काल सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली. फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला असून 8-10 दिवसांत योग्य निर्णय घेऊ असे सांगितल्याचे समजते.
मात्र भुजबळांच्या या जाहीर नाराजीनंतर अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केली. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, तो आम्ही सोडवू असे म्हणत त्यांनी या विषयावर मीडियासमोर आणखी बोलणे टाळले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या , शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनीच अजित पवारांना टोला हाणला आहे. बहुमत आहे म्हणून असं कुणालाही डावलता येणार नाही, असं म्हणत शिरसाट यांनी अजित पवारांनांच एकाप्रकारे सुनावलं आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ ज्याने त्याने कसा घ्यायचा, तो घेतला पाहिजे. बहुमत आहे आणि त्या पक्षामध्ये काय होईल व नाराज आहे तो त्या पक्षाचा नेत्याचा विषय असतो, अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले असेल तर, तेच त्याबद्दल चांगले उत्तर देऊ शकतात. परंतु मला वाटते आता भुजबळ साहेब नाराज नाहीत, त्यांचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे ते महायुतीमध्ये चांगल्या पद्धतीने स्थानापन्न होतील. छगन भुजबळ यांचा सरकारमध्ये समावेश करून घ्यायचा का नाही हे मुख्यमंत्री ठरवतील, असे शिरसाट म्हणाले. छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत आणि त्यांना साईड ट्रॅक करून चालणार नाही. हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन जाणारं आहे, म्हणूनच बहुमत आहे म्हणून असं कुणाला डावलता येणार नाही असा शिरसाटांनी अप्रत्यक्षरित्या पवारांना सुनावलं.