जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांच्या गळ्यात? अधिकृत घोषणेपूर्वीच केली मोठी घोषणा

| Updated on: Jan 13, 2025 | 10:03 AM

गुलाबराव पाटील यांनी पालकमंत्रीपदाची घोषणा होण्यापूर्वीच स्वत:ला जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे. नुकत्याच एका भाषणात त्यांनी स्वतःच स्वतःला पालकमंत्री म्हणून संबोधित केले आहे.

जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांच्या गळ्यात? अधिकृत घोषणेपूर्वीच केली मोठी घोषणा
gulabrao patil
Follow us on

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरु आहे. सध्या आपपल्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. त्यातच आता आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वत:च स्वत:ला पालकमंत्री म्हटले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. नुकत्याच एका भाषणात त्यांनी स्वत:ला जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याचे म्हटलं आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आक्रमक नेते अशी ओळख आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असताना नुकतंच गुलाबराव पाटील यांनी जोरदार भाषण केले. जळगाव तालुक्यातील वावदडा गावातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमला ते उपस्थितीत होते. या प्रसंगी गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.  या भाषणात त्यांनी पालकमंत्री काय असतो ते दाखवून देणार, असा सज्जड दम भरला आहे.

कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर…

“सरकार काठावर येईल असं सर्वांना वाटलं होतं. मात्र बंपर बहुमत मिळालं. 237 जागा निवडून आल्या. लाडक्या बहिणींनी असा करंट मारला की त्यांचे सावत्र भाऊ डायरेक्ट ठार झाले. कोणत्याही नेत्याचा राजकारण हे कार्यकर्त्यांच्या भरोशावर होतं. ज्या नेत्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत, तो नेता श्रीमंत असतो असं म्हणतात. मी आतापर्यंत मंत्रीपद दाखवलं नाही. पण माझ्या कार्यकर्त्यांकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर मग पालकमंत्री काय असतं ते दाखवून देणार,” असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. मात्र नियुक्ती झालेली नसताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात स्वतःच स्वतःला पालकमंत्री म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी पुन्हा मंत्री गुलाबराव पाटील यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला बेसावध राहून चालणार नाही

“227 जागा आल्या तर मात्र मंत्रीपद मिळेल का नाही मिळेल, याची काळजी होती. टीव्हीवर फोटो तरी सुद्धा पण मिळेल का, हे माहित नव्हतं. पण मिळालं. आता पुढच्या काळामध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला बेसावध राहून चालणार नाही. तुम्ही फक्त तिकिटांसाठी लढाई करू नका. भाजप शिवसेना एकत्र लढले तर समोरच्याची एक पण जागा निवडून येणार नाही. कार्यकर्त्यांना मी हात जोडून सांगणार आहे की तुम्ही असे वागा हे लोकांना वाटलं पाहिजे की हो हे गुलाबराव पाटलांचे कार्यकर्ते आहेत”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.