नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी बोचरी टीका शिवसेना नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत (Gulabrao Patil on Raj Thackeray) होते.
‘राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे (नाशिकमध्ये) दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचं सरनेम, यांच्या नेत्याचं नाव जर ठाकरे नसतं, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचं वलय त्यांच्याकडे दिसतंय.’ अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
नाशिकमधील प्रभाग क्र. 26 च्या पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
मनसेच्या झेंड्यात आता भगवा रंग, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी नव्या झेंड्याचे अनावरण?
भाजपने नोटबंदी करुन फसवणूक केली आणि आता म्हणता हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केलेली का नाही चालत नाही? असा प्रश्न गुलाबरावांनी विरोधकांना विचारला. भाजपवाले आमच्यात भाडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. अमर अकबर अँथनी बघितला आहे का? असा प्रश्न विचारत गुलाबरावांनी हशा पिकवला.
आमच्या पोराला तुम्ही काळं बोलणार आणि स्वतःच्या पोराला गोरं बोलणार. भाजप फक्त निवडणुकीत पैशाचा वापर करते त्यांच्याकडे दुसरं काही नाही. पैसे वाटायचे आणि तेच नंतर वसूल करायचे. त्यांनी या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाचा फक्त वापर केला, असा घणाघातही गुलाबराव पाटील यांनी केला. मला 65 % मुस्लिमांनी मतं दिली, असा दावाही पाटलांनी केला.