मुंबई : 24 ऑगस्ट 2023 | एकनाथ शिंदे यांच्या गटातील 16 आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी तब्बल सहा हजार पानी उत्तर पाठवलं आहे. आमचाच पक्ष योग्य असून आम्ही उत्तर दिलयं. त्यावर आम्हाला समक्ष युक्तीवाद करायलाही आवडेल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
उद्धव साहेब त्यावेळी म्हटले होते कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. पण त्यांनी युती केली. त्यांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला होता. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झालो. त्यांच्या दावणीतून पक्ष बाहेर काढला. आम्ही कुठलही पाप केलं नाही. उलट आम्ही पुण्य केलं. बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. पण, हे त्यांना पाप वाटत आहे का? असा सवाल त्यांनी केला.
कांद्याप्रश्नाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. राज्याची विनंती मान्य करून केंद्राने कांदा विक्रीचा निर्णय घेतला. त्यामुळे काही ठिकाणी कांदा खरेदी सुरू झाली. तर काही ठिकाणी नाही. याबाबत केंद्रीय मंत्री भारतीताई पवार या सर्वांच्या संपर्कात आहेत. त्यावर लवकरच तोडगा निघेल. अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना मदत करण्याबाबत सरकारमध्ये कोण कोणाची कोंडी करत नाही. जे नियमात असेल ते केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील काही भागात पाऊस लांबला. त्यामुळे पीकांचे नुकसान झाले. राज्यातील धरणातील पाण्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी काही सूचना दिल्या आहेत. शेतीचे पाणी आणि पिण्याचे पाणी याचे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे तरीही काही बँका त्याच्याकडे कर्ज फेडीसाठी तगादा लावत असतील तर त्याबाबत सरकारी बॅकाबाबत सहकार मंत्री यांच्याशी बोलणार आहे. तसेच, राष्ट्रीय बॅकाच्या संदर्भात अर्थमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा एक गट म्हणजेच अजित दादा आमच्यासोबत आहेत. त्यांनी उघड भूमिका घेतली आहे. विकासासोबत काम करण्याची त्यांची इच्छा आहे. अजित दादा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत आणि तो पक्षच आमच्यासोबत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही, असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.