या राज्याच्या मंत्रीमंडळात दोन-तीन सिंघम असताना बाबा सिद्दीकी यांची हत्या होते. आणिएक गँग त्यांच्या हत्येची जबाबदारी घेते. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खोकेगिरी आणि बोलबच्चनगिरी कमी केली आणि या राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष दिलं तर बरं होईल. पब्लिसिटीसाठी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला गोळ्या घातल्या होत्या. मग आता गोळ्या घाला ना ! तुमच्या एका सहकाऱ्याची हत्या होते, त्या गुंडाना पकडण्यात येतं मग त्यांनाही गोळ्या घाला ना. हेच मुख्यमंत्री शिंदे एकेकाळी म्हणाले होते ना, की मुंबईत लॉरेन्स बिश्नोई वगैरे गँग चालणार नाही,मी बघून घेईन, मग आता बघून घ्या ना, अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला.
मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचं सूत्रसंचालन गुजरातमधून
या हत्याकांडाचा मुख्य आरोपी गुजरातच्या एका जेलमध्ये आहे. गुजरातच्या एटीएसच्या ताब्यात असलेली व्यक्ती मुंबईतील एका हत्येची जबाबादारी घेते,ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. मुंबईतील संपूर्ण गुन्हेगारीचं सूत्रसंचालन गुजरातमधून होतंय हे आम्ही गेल्या कित्येक काळापासून म्हणतोय. ही घटना त्याचंच एक ज्वलंत उदाहरण आहे. सगळं काही गुजरातमधून सुरू आहे. मुंबईतून उद्योग पळवायचे, मुंबईतून पैसा पळवायचा , मुंबईतल्या माणसांना त्रास द्यायचा, त्यांच्या हत्या करायच्या, याचं सगळं सूत्रसंचान गुजरातूनमधून सुरू आहे, असा आरोप राऊतांनी केला.
राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम
गुंडांची टोळी कार्यरत आहे, अशा प्रकार हत्या होत आहेत, अशा वेळी अजित पवारांनी काही पाऊल उचललं पाहिजे ना, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. ‘ अजित दादा FLns सिंघम आहेत, इथे एक फुल दोन हाफ सिंघम आहेत.खरंतर आपल्या एका सहकाऱ्याची हत्या झाल्यावर त्यांनी निषेध व्यक्त केला, त्याशिवाय काय केलं ? फक्त निषेध व्यक्त करणं हे गांडू गिरीचं लक्ष आहे राजकारणात’ अशा शब्दांत राऊत यांनी अजित पवार यांनाही फटकारलं.
खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्याचा राजीनामा मागायला हवा होता, एवढ्या जवळच्या सहकाऱ्याची हत्या झाली. राज्याची कायदा-सुव्यवस्था कोलमडून पडली आहे. त्याच मंत्रीमंडळात तुम्ही बसता, तिथेच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. तुम्ही लोकं काय करत आहात नक्की ?
सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटत आहे कधी कुठून गोळी चालेल कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई आणि पुण्यात याचा भरोसा नाही. या सगळ्या गुंडाचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करत आहेत, असा आरोपही राऊत यांनी लगावला. एकनाथ शिंदेंनी गुंडांच्या टोळ्या पुसलेल्या आहेत पोलीस स्टेशनमध्ये आणि बाहेर लोकसभेत त्यांचा वापर झाला आणि विधानसभेत देखील होईल , असे राऊत म्हणाले.