आमच्या महाविकास आघाडीत जागा वाटप व्यवस्थित सुरू आहे. आमच्या चर्चा सुरू आहेत. बैठका होत आहे. आमच्यात कोणतीही भांडणं नाही. कोणताही वाद नाही. आमच्यात मतभेद नाही, पण दुमत असू शकतं, असं मोठं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. तसेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले ही त्यावेळी राज्याची आणि महाविकास आघाडीची गरज होती, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जागा वाटपावरून आमच्या वाद सुरू आहेत. मतभदे आहेत. ही तुमची माहिती चुकीची आहे. आमची प्रत्येक जागेवर सहमती आहे. मीडियातील बातम्या अफवा आहेत. पेरलेल्या आहेत. आम्ही व्यवस्थित चर्चा करत आहोत. सीट टू सीट चर्चा सुरू आहे. इतक्या मोठ्या राज्यात एखाद्या जागेवरून मतभेद नाही तर दुमत असू शकतं. अशा जागा नंतर चर्चेला येतील. त्या फार नाहीत. ओव्हर ऑल आमच्याकडे जागा वाटपाबाबत एकमत अधिक आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मोदींना हरवलं, आता…
जागा वाटपाबाबत बंद खोलीत चर्चा सुरू आहे. बंद खोलीतील चर्चा तुम्हाला का सांगायच्या? पण आमच्यात मतभेद नाहीत. जागा कोणत्या आणि कशापद्धतीने लढायच्या यावर चर्चा सुरू आहे. आम्ही लोकसभेत नरेंद्र मोदींचा पराभव केला. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचा पराभव करू. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जागा वाटप पूर्ण झालेलं असेल. तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपावर संयमाने चर्चा करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. जिंकेल त्याची जागा हेच आमचं जागा वाटपाचं सूत्र आहे. मुंबईच्या जागांचं वाटप फार कठिण नाही. मुंबईचंही जागा वाटप होईल, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी कधी अर्थ पंडित झाले?
संजय राऊत यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्दयावरूनही भाजपवर हल्ला चढवला. निवडणुकीतील आर्थिक खर्च वाचवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन घेतलं जात आहे, असं सांगण्यात येतंय, याकडे राऊत यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं. मोदींना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं? मोदी कधी अर्थ पंडित झाले? इतक्या वर्षात निवडणुका झाल्या, आपल्या पूर्वजांनी, घटनाकारांनी काळजीपूर्वक तरतुदी केल्या आहेत. मोदी आणि त्यांच्या लोकांनी नवीन संविधान लिहू नये. हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. भाजप भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे. त्यासाठी हे फंडे वापरत आहे, असा हल्लाच राऊत यांनी केला.
भाजपसोबत कोण आहे?
भाजपने समान नागरी कायद्याचा खोटा प्रचार केला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटल्याचं राऊत यांच्या निदर्शनास आणून दिलं. या मुद्द्यावरून राऊत यांनी अजितदादांना चांगलंच फैलावर घेतलं. भाजपने खोटा प्रचार केला तर भाजपसोबत कोण आहे? या खोट्या प्रचाराचा विरोध अजित पवार यांनी पुढे येऊन करावा, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.