संजय राऊत यांचा नितीन गडकरी यांना मोठा सल्ला, म्हणाले “आता हळूहळू…”

| Updated on: Sep 17, 2024 | 4:45 PM

नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सहभागी झाला, तर हुकुमशाही, भ्रष्टाचारीविरुद्ध लढाईला बळ येईल त्यादृष्टीने जर त्यांना कोणी ऑफर दिली असेल तर त्याचे स्वागत करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचा नितीन गडकरी यांना मोठा सल्ला, म्हणाले आता हळूहळू...
Follow us on

Sanjay Raut On Nitin Gadkari Prime minister offer : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा मोठा खुलासा नितीन गडकरी यांनी केला होता. आता यावरुन राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यावर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरींना मोठा सल्ला दिला आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांना नितीन गडकरींच्या पंतप्रधानपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी नितीन गडकरींना एक मोठा सल्ला दिला. तुमची विचारधारा असेल पण देश खड्ड्यात जातोय. तुमच्या विचारधारेमुळे देश हुकुमशाहीच्या गर्तेत जातोय, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.

“…तर त्याचे स्वागत करायला हवे”

नितीन गडकरींनी पंतप्रधान पद नाकारण्याची कारणं काहीही असतील. पण आज देश ज्या परिस्थितीतून जातोय, सर्वत्र हुकुमशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार या चिखलातून बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्षाने एकजुटीने काही निर्णय घेतले. त्या भूमिकेत पक्षात राहून आपली मतं व्यक्त करणारे नितीन गडकरी आहेत. त्यांच्या पक्षातील ते एकमेव नेते आहेत आणि सध्या मोहन भागवत जे मुद्दे मांडत आहे. अशावेळी विरोधी पक्षाला असं वाटलं की नितीन गडकरींसारखा एक नेता आपल्या आघाडीत सहभागी झाला, तर हुकुमशाही, भ्रष्टाचारीविरुद्ध लढाईला बळ येईल त्यादृष्टीने जर त्यांना कोणी ऑफर दिली असेल तर त्याचे स्वागत करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.

“मोदींचं बहुमत आम्ही खेचून घेतलं”

पण ही ऑफर स्वीकारायलाही नैतिक बळ लागतं. हिंमत लागते. ही देशाची लढाई आहे. त्यामुळे विचारधारा वैगरे हे शब्द जे नितीन गडकरी वापरतात, त्याला आम्ही मानत नाही. तुमची विचारधारा असेल, पण देश खड्ड्यात जातोय. तुमच्या विचारधारेमुळे देश हुकुमशाहीच्या गर्तेत जातोय. तुमची विचारधारा असली तरी या देशाचा भ्रष्टाचार आणि उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम तुम्ही उघड्या डोळ्याने पाहताय. ही लढाई जेव्हा सुरु झाली, तेव्हा आम्ही काहीही नव्हतो. पण लढाई संपली तेव्हा मोदींचं बहुमत आम्ही खेचून घेतलं, असेही संजय राऊतांनी म्हटले.

दबाव टाकल्याने ऑफर नाकारली

“नितीन गडकरींवर दबाव टाकल्याने त्यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारली ही शक्यता नाकारता येत नाही. त्यावर तेच जास्त प्रकाश टाकू शकतात. पण नितीन गडकरी यांना हे सांगायला हीच वेळ का सापडली. भाजपला १०० दिवस पूर्ण होत आहे. पण भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, अस्पष्टता आहे. एका बाजूला सरकारच्या बाहेर मोहन भागवत बोलतात. त्यामुळे नितीन गडकरी यांनी देखील हळूहळू आघाडी उघडली पाहिजे”, असा सल्लाही संजय राऊतांनी दिला.