राज्यात काल विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला आहे. शरद पवार गटाने पुरस्कृत केलेले शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा काल पराभव झाला. त्यामुळे राज्यात महायुतीचा दबदबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या विजयावरून महायुतीवर जोरदार टीका केली आहे. विजयाचा उन्माद कसला करता आहात? गद्दारांनी गद्दारांना विजयी केलं, असं सांगतानाच संजय राऊत यांनी काल आमदारांना अमिष दाखवल्याचा दावा केला आहे. आमदारांचा कालचा भाव कोटीच्या घरात होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना आमदारांचा कालचा भाव किती होता याचा आकडाच सांगितला. तसेच आमदारांना शेत जमीन दिल्याचा दावाही केला आहे. काल आमदारांचा भाव पाहिला असेल. शेअर बाजाराप्रमाणे चढत होता. शेअरबाजाराप्रमाणे अपक्ष आमदारांचा आणि लहान पक्षाचा भाव कसा चढत होता हे आम्ही पाहिलं आहे. कालचा भाव माहीत आहे का? ज्यांना 23च्या पुढे मते पडली. त्यांचा भाव समजून घ्या. नुसता भाव नव्हता. काही आमदारांना दोन एकर जमीन देण्यात आली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
ज्यांची ‘समृद्धी’ वाढली…
जे आमदार धर्मनिरपेक्ष समजतात. समाजवादी विचाराचे समजतात असे अनेक आमदार आहेत. ते फुटले. कालच्या आमदारांचा भाव जो फुटलेला आहे. तो 20 ते 25 कोटीपर्यंत आहे. महाविकास आघाडी हा खेळ खेळणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांची ‘समृद्धी’ वाढली आहे, त्यातून हा पैसा जाऊ शकतो, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पण ही निवडणूक साधी नव्हती. सोपी नव्हती. पैशाची होती. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती. आमच्याकडे जेवढी मते होती, त्या बळावर आम्ही निवडणूक लढवली, असं ते म्हणाले.
थोडं गणित जमलं असतं तर
महाविकास आघाडीने दोन्ही उमेदवार निवडून आणले आहेत. काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होतं. त्यांनी त्यांचा उमेदवार निवडून आणला. शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं. शिवसेनेकडे स्वत:ची 15 मते होती. असं असतानाही मिलिंद नार्वेकरांना उतरवलं. काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. थोडसं गणित जमलं असतं तर जयंत पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मताने जिंकले असते. ते गणित जमू शकले नाही. यात मते फुटली, आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकमेकांना पेढे भरवत आहेत, हे हस्यास्पद आहे, असा टोला त्यांनी लगावला.
अशावेळी चुका होतात
जयंत पाटील यांच्याकडे एकही मत नव्हतं. आम्हीही इतर घटक पक्षांवर अवलंबून होतो. समाजवादी पार्टीचे लोकं असतील. एमआयएम असेल किंवा अन्य काही पक्ष असतील. बच्चू कडू नेहमी गर्जना करत असतात. हे सर्व लोकं शेवटी सरकारबरोबर गेले. जयंतराव पाटील यांच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. शरद पवार गटाची सर्व मते त्यांना पडली. गणितात अशावेळी चुका होतात. शेकाप हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा पक्ष आहे. त्यांनी रायगडमध्ये महाविकास आघाडीसाठी प्रचंड काम केलं. शरद पवार यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न केला. पण आहे त्या मतांमध्येच आम्हाला खेळावं लागलं. सत्ता असती, पैसा असता तर चित्र वेगळं असतं, असंही ते म्हणाले.
पटोले विधान परिषदेतच होते
विधान परिषदेची निवडणूक असताना नाना पटोले हे वारीत होते, असा सवाल करण्यात आला. राऊत यांनी या प्रश्नात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. नाना पटोले काल विधान परिषद निवडणूक होईपर्यंत हे विधान परिषदेत ठाण मांडून होते. काँग्रेसचे इतर नेतेही तिथेच होते. आम्ही तिथेच होतो. नाना पटोले यांचं निवेदन पाहिलं. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर कारवाई करू असं पटोले म्हणाले. हे गद्दार आहेत. पक्षात राहून गद्दारी करतात त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असं त्यांनी सांगितलं, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.