शिवभक्त असाल तर केसरकरांना मंत्रालयासमोरच जोड्याने मारा; संजय राऊत यांचं फडणवीस यांना आव्हान

| Updated on: Aug 28, 2024 | 10:33 AM

मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे. हा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. त्यावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. वाऱ्याच्या वेगाने तिथल्या घरावरची पत्रे उडाले नाहीत, नारळी पोफळीची झाडे पडली नाही. एक पानही गळालं नाही. फक्त पुतळाच कसा काय पडला? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

शिवभक्त असाल तर केसरकरांना मंत्रालयासमोरच जोड्याने मारा; संजय राऊत यांचं फडणवीस यांना आव्हान
Follow us on

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच राज्यातील मंत्र्यांनी बेताल विधानं सुरू केल्याने रोषात अधिकच भर पडली आहे. राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी काल या पुतळ्याची पाहणी केली. पुतळा पडला ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. हिंमत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल अशी बेताल विधाने करणाऱ्या मंत्र्याला जोड्याने मारा, असं आव्हानच संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा संताप व्यक्त केला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही राज्याच्या मनावर झालेली जखम आहे. असं असताना काही मंत्री मात्र बरं झालं पुतळा पडला. त्यातून चांगलं होईल, अशी विधाने करत आहेत. अशी विधाने करणारे लोक हे अफजल खानाची औलाद आहे. ही माणसं मिंध्यांनी पोसली आहेत. हे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. हे सडक्या विचाराचे लोक आहेत. बरं झालं ते आमच्यामधून गेले. ही घाण आमच्यातून गेली हे बरं झालं, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.

हे फडणवीस यांचं पाप

शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मंत्र्यांच्या तोंडून असे शब्द निघूच कसे शकतात? पुतळा पडल्याने त्यातून काही शुभ घडेल असं म्हणणारी माणसं मंत्रिंडळात असूच कशी शकतात. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. पैसे खाण्यासाठीच हा पुतळा पाडला गेला, हा आरोप नसून सत्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

हा पुतळा नेव्हीने बनवलेला नव्हता. तो पीडब्ल्यूडीने बनवला होता. त्यामुळे या प्रकाराला तुमचं सरकार जबाबदार आहे. फडणवीस तुम्ही आमचं तोंड उघडू देऊ नका. तुमचंच हे पाप आहे. शिवाजी महाराजांचा पराभव अफजल खान किंवा औरंजेबाने केला नाही. भाजप आणि फडणवीस यांच्या विकृत मनोवृत्तीने शिवाजी महाराजांचा पराभव झाला आहे, असं सांगतानाच पुतळा पडला बरं झालं असं म्हणणारा मंत्री फडणवीस यांच्या सोबत काम करत आहे. ही शिंदेंची गँग आहे. फडणवीस त्यांची वाहवा करत आहे. त्या मंत्र्याला बुट मारलं पाहिजे. फडणवीस सच्चे शिवभक्त असतील तर त्यांनी केसकरला बुटाने मारलं पाहिजे, असं आव्हानच राऊत यांनी दिलं आहे.